रोहित शेट्टी आजच्या घडीला बॉलिवूडमधला सर्वात आघाडीचा दिग्दर्शक होय. १०० कोटींहून अधिकचा टप्पा पार करणारे सलग ८ हिट चित्रपट देणारा रोहित शेट्टी हा बॉलिवूडमधला आत्ताचा एकमेव दिग्दर्शक आहे. विशेष म्हणजे या सर्व यशाचं श्रेय तो अभिनेता अजय देवगनला देतो. ‘गोलमाल’, ‘गोलमाल अगेन’, ‘गोलमाल ३’, ‘सिंघम’, ‘सिंघम रिर्टन’ अशा चित्रपटात रोहित -अजय देवगनच्या जोडीनं एकत्र काम केलं आहे. हे पाचही चित्रपट बॉलिवूडमध्ये सुपहिट ठरले. म्हणूनच या यशाचं सारं श्रेय त्यानं अजयला दिलं आहे.
‘मी आज जो कोणी आहे ते केवळ अजय देवगनमुळे, तो माझा मोठा आधारस्तंभ आहे. माझ्या आयुष्यातील त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. रणवीर माझ्यासाठी लहान भावासारखा आहे पण, अजयचं माझ्या आयुष्यातील स्थान खूपच खास आहे. ‘ असं म्हणत रोहितनं भावूक प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूडध्ये रोहित शेट्टी आणि अजय देवगनचं समीकरण खूपच खास आहे. ही जोडी म्हणजे बॉलिवूडमधली हिट जोडी आहे. लवकरच ‘गोलमालचा’ चौथा भाग घेऊन ही जोडी रुपेरी पडद्यावर परतणार असल्याची शक्यता आहे.
गेल्याच महिन्यात रोहित शेट्टीचा ‘सिम्बा’ चित्रपट प्रदर्शित झाला. रणवीर सिंग, सारा अली खानसह अकरा मराठी कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. ‘सिम्बा’ने अवघ्या दोन आठवड्यात बॉक्स ऑफीसवर २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.