हिंदी आणि मराठी दोन्ही मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने स्वतंत्रपणे नाव कमावलेले राकेश बापट आणि अनुजा साठे हे दोन्हीही कलाकार ‘व्हॉट्सॲप लव’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. येत्या ५ एप्रिल रोजी त्यांचा ‘व्हॉट्सॲप लव’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हीजनवर प्रेक्षकांची पसंती मिळविलेले हे दोन्ही कलाकार आपल्या मातृभाषेतील चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. संगीतविश्वातील कॉन्सर्ट किंग अशी ओळख असलेले हेमंतकुमार महाले यांनी चित्रपटाची कथा लिहीली आहे. तसेच त्यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

‘व्हॉट्सॲप लव’ या चित्रपटाची कथा ही सध्या जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात या ना त्या मार्गाने घडत आहे. कृत्रीम संबंध, भावभावना जोपासताना तारेवरची होणारी कसरत आणि भौतिक सुखाचा माग घेताना सांडत चाललेला खरेपणा आणि आलेले एकाकीपण याभोवती ही कथा फिरते. नव्या संपर्कयंत्रणेच्या माध्यमातून हे सगळे कसे घडते हे या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. हा सिनेमा हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत बनवण्यात आला आहे. व्हॉट्सॲप वापरणाऱ्या प्रत्येकाला हा चित्रपट पाहून आनंद होईल, याची मला खात्री आहे” असे कथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माता हेमन्तकुमार महाले यांनी सांगितले.

व्हॉट्सॲप हा सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. केवळ व्हॉट्सॲपवरून सर्वांशी संपर्कात राहाता येत असल्याने युवकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेत. व्हॉट्सॲप वरून आलेल्या संदेशातील भावभावनांचा ओलावा किंवा शब्दांमागील भावार्थ ज्याच्या त्याच्या समजण्यावर अवलंबून असतो. त्यामुळे अनेक समज – गैरसमज निर्माण होतात आणि पुढे प्रसरण पावतात. पण, थेट संवाद साधण्यासाठी न धजावणाऱ्या व्यक्तीलाही आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं अधिक सोपे वाटू लागल्याने प्रेम प्रकरणात व्हॉट्सॲप मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे. पण, ‘व्हॉट्सॲप लव’ या सिनेमाची व्हॉट्सॲप लव्हस्टोरी नेमकी काय आहे? हे फक्त राकेश बापट आणि अनुजा साठे या दोघांनाच माहित आहे. त्यामुळे हे व्हॉट्सॲप लव प्रकरण जाणून घेण्यासाठी हेमंतकुमार म्युझिकल ग्रुपची निर्मिती असलेल्या या व्हॉट्सॲप लव चित्रपटासाठी ५ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांच्या कॅमेऱ्याने टीपला असून पिकल एंटरटेनमेन्टचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी हे वितरणाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Story img Loader