ऐन उमेदीत मराठी रंगभूमीवरील देखणा, हरहुन्नरी, रुबाबदार नट म्हणून ओळखला जाणारा एक नट अचानक झालेल्या एका अपघातात स्मृती गेल्यामुळे रंगभूमीपासून दुरावतो. सात-आठ महिने स्मृतिभ्रंशाच्या अवस्थेत काढल्यावर अथक वैद्यक उपचारांना यश येऊन पुनश्च त्याची स्मृती परत येते. परंतु आता तो पूर्वीच्या आत्मविश्वासाने रंगमंचावर उभा राहू शकत नाही. तरीही त्याची नाटय़सृष्टीतली मित्रमंडळी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहतात.. आणि तो पुन्हा एकदा रंगमंचावर अवतरतो. दोन नाटकांतून सफाईने कामं करतो. परंतु आता त्याला स्वत:लाच थांबावंसं वाटतं. आणि तो स्वेच्छेनेच रंगावकाशातील प्रकाशझोतापासून दूर जातो.
..त्यानंतर र्वष लोटतात. आता त्याने वेगळ्याच उद्योगांमध्ये स्वत:ला झोकून दिलेलं असतं. पण वयाची ऐंशीची वेस पार केल्यावर त्याला पुन्हा एकदा रंगभूमी खुणावू लागते. आणि मग तो नव्या रूपात पुनश्च रंगभूमीवर पुनरागमन करतो..  आता एका निर्मात्याच्या भूमिकेत! आपले निकटचे नातलग अभिजीत साटम आणि ऋजुता चव्हाण यांना साथीला घेऊन!
नाटक असतं.. ‘मिस्टर अ‍ॅंड मिसेस’! आज वाहिन्यांवरच्या रिअ‍ॅलिटी शोज्नी माणसाचं आयुष्य कसं काबीज केलं आहे.. त्याच्या व्यक्तिगत जगण्यातही त्यांनी कशी घुसखोरी केली आहे, हे भेदकपणे दाखवणारं हे नाटक. त्याचे पडद्याआडचे निर्माते आहेत एकेकाळचे अभिनेते नरेन चव्हाण! नाटकाच्या श्रेयनामावलीत कुठंच न येता त्यांनी केलेली ही पहिली नाटय़निर्मिती!
नुकत्याच दुबईत झालेल्या ‘मिक्ता’ पुरस्कार सोहळ्यात ‘मिस्टर अ‍ॅंड मिसेस’ नाटकाने सर्वोत्तम निर्मितीसह तब्बल सहा पुरस्कार पटकावले. नरेन चव्हाण यांना त्यांची निर्मिती असलेल्या या पहिल्याच नाटकानं मिळवलेल्या या यशानं खूप समाधान दिलं आहे. रंगभूमीवरची त्यांची ही नवी खेळीही यशस्वी ठरल्याची जणू ही पावतीच!
‘दिवा जळू दे सारी रात’, ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘अपराध मीच केला’, ‘नयन तुझे जादुगार’, ‘शिवरायाचे आठवावे रूप’, ‘सौभाग्य’, ‘पुत्र मानवाचा’, ‘प्रीतीगंध’, ‘गगनभेदी’ अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये प्रमुख भूमिकांमध्ये वावरलेले नरेन चव्हाण आज आपल्या आयुष्याचं अनुभवसंचित कवितांतून शब्दबद्ध करत वयाच्या ८२ व्या वर्षी रंगभूमीवर निर्माते म्हणून पुनश्च दमदार खेळी करण्याची उमेद बाळगून आहेत. आणि लवकरच ते एक नवे नाटक घेऊन येत आहेत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा