अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तिच्या चित्रपटांमुळे तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिली आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमधून काम केले. ‘पुष्पा’सारख्या चित्रपटात आयटम साँग करून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पण, तुम्हाला माहीत आहे का की, ‘ऊ अंटावा’ हे आयटम साँग करण्यापूर्वी, अभिनेत्रीला ते न करण्याचा सल्ला देण्यात आला होता? त्यावेळी त्यांच्या घटस्फोटाबद्दल खूप चर्चा झाली होती. एवढेच नाही, तर घटस्फोटानंतर तिला लपून राहण्यास सांगितले गेले होते. अभिनेत्रीची या बाबतीत प्रतिक्रिया काय होती ते आम्ही तुम्हाला सांगतो.
खरं तर, समांथा रुथ प्रभू आज ३७ वर्षांची झाली आहे. तिचा जन्म २८ एप्रिल १९८७ रोजी झाला. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येते. तिची परिस्थिती अशी होती की, त्यांच्या कुटुंबाकडे तिला बारावीनंतर शिक्षण देण्यासाठीही पैसे नव्हते. त्यानंतर तिने स्वतः मॉडेलिंग करून स्वतःचा खर्च उचलला. रवी वर्मनच्या ‘ये माया चेसावे’ या चित्रपटात ती पहिल्यांदा दिसली होती. समांथा तिच्या व्यावसायिक आयुष्यात यशस्वी ठरली होती; पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. सध्या ती दिग्दर्शक राज निदिमोरूला डेट करीत असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.
२०१७ मध्ये समांथा आणि नागा चैतन्य यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. त्यांचे लग्न त्या काळातील सर्वांत महागड्या आणि चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक होते. पण, त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण होण्याच्या एक महिना आधी, त्यांनी वेगळे होण्याची घोषणा केली. त्यानंतर समांथावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. या सगळ्यामध्ये समांथाने ‘मिस मालिनी’शी संवाद साधला, ज्यामध्ये तिला ‘ऊ अंटावा’ हे आयटम साँग न करण्याचा सल्ला दिला गेला होता. तिला घरात लपून राहण्याचादेखील सल्ला देण्यात आला होता.
लग्न टिकले नाही, तर माझी काय चूक?
समांथाने लग्न तुटल्याबद्दल आणि तिच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांबद्दल सांगितले होते की, तिला प्रश्न पडला होता की, तिने काही गुन्हा केला आहे का? मी लपून बसणाऱ्यांपैकी नाहीये, समांथाने स्वतः कबूल केले की, तिने काहीही चुकीचे केले नाही. लोक तिचा तिरस्कार करतील, तिला ट्रोल करतील याची तिला वाट बघायची नव्हती. कारण- ती स्वतःला लपवणाऱ्यांपैकी एक मानत नाही. जर लग्न तुटले, तर तिचा काय दोष आहे, असे तिला वाटते?