बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी कारकिर्दीच्या सुरूवातीस रेडिओवर सुत्रसंचालन करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते, या गोष्टीची माहिती फार कमीजणांना असेल. हिंदी चित्रपटसृष्टीत येऊन आपले नशीब आजमवण्यापूर्वी अमिताभ मुंबईतील ऑल इंडिया रेडिओच्या कार्यालयात मुलाखतीसाठीसुद्धा गेले होते. त्यावेळी रेडिओ विश्वात पुनरागमन केलेले प्रसिद्ध रेडिओ कलाकार अमीन सयानी त्यांच्या ‘सितारो की जवानियाँ’ या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या तयारीत व्यग्र होते. मात्र, अमिताभ कोणतीही पुर्वसूचना न देता मुलाखतीसाठी गेल्याने अमीन सयानी यांनी त्यांची भेट नाकारली होती. याबद्दलच्या आठवणी सांगताना अमीन सयानी म्हणतात, “ते साधारण साठीच्या दशकातील शेवटचे दिवस असतील. त्यावेळी मला एका आठवड्याला  तब्बल २० कार्यक्रम करावे लागत होते आणि रेडिओ कार्यक्रमांशी संबंधित प्रत्येक प्रक्रियेत मी व्यग्र होतो. त्यावेळी कोणतीही पूर्वसूचना न देता एक किरकोळ शरीरयष्टीचा तरूण मला भेटण्यास आला होता. परंतु, त्यावेळी माझ्याकडे वाया घालवण्यासाठी एक क्षणसुद्धा नव्हता म्हणून मी अमिताभ बच्चन नावाच्या त्या तरूणाची भेट नाकारली. त्यानंतर अनेकदा हा तरूण मला भेटण्यासाठी रेडिओच्या कार्यालयात येत राहिला आणि मी प्रत्येकवेळी माझ्या सचिवाकरवी त्याला वेळ घेऊन ये असे सांगत राहिलो. काही काळ गेल्यानंतर अमिताभ बच्चन ‘आनंद’ आणि ‘शोले’ या चित्रपटांतून लोकप्रिय झाले. ऑल इंडिया रेडिओच्या कार्यालयात कामासाठी फेऱ्या मारणारा हाच तो तरूण हे समजल्यावर मला धक्काच बसला होता. त्यावेळी अमिताभ यांचा ‘आनंद’ चित्रपटातील आवाज आणि व्यक्तिमत्व पाहून मी अक्षरश: थक्क झालो होतो. परंतु, या घटनेनंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, जे होते ते चांगल्यासाठीच होते.” अमिताभ बच्चन यांनीसुद्धा अनेक कार्यक्रमांत उमेदीच्या काळातील संघर्षाची कहाणी सांगताना या प्रसंगाचा उल्लेख केला आहे.  

Story img Loader