अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बॉयकॉट करण्यामागची मागणी सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केली होती. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रटापेक्षा रणबीर कपूर सध्या जास्त चर्चेत आहे. त्याचा ११ वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे, ज्यात तो असं म्हणाला होता की ‘मला बीफ खायला आवडतं’. रणबीर कपूर हा अभिनेता म्हणून आपल्याला वैविध्यपूर्ण भूमिकेत दिसून आला आहे. ‘सावरिया’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आजवर त्याने अनेक भूमिका केल्या आहेत मात्र त्याला एक भूमिका करण्याची इच्छा आहे, ती नेमकी कोणती आहे हे जाणून घेऊयात..
मुंबई पोलिसांसाठी ‘उमंग’ हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. या कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रेटी सर्व पोलिसांचे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. २०१९ सालच्या कार्यक्रमात रणबीर कपूरने देखील हजेरी लावली होती. रणबीर कपूर जेव्हा मंचावर आला तेव्हा तो म्हणाला, ‘मी एकदा जात असताना माझी गाडी एका पोलीस अधिकाऱ्यांनी अडवली होती. त्यांना माहित नव्हते मी गाडीत आहे. त्यांनी मला बघितल्यावर माझ्यासोबत एक फोटो काढला. त्यानंतर अर्धा तास त्यांनी मला झापलं की मी कसे चुकीचे चित्रपट निवडत आहे. त्यांनी मला सल्ला दिला की तू एकदा तरी पोलिसांवर बेतलेल्या चित्रपटात काम करावं’. रणबीर पुढे म्हणाला की, ‘मला आजवर कोणीही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका विचारली नाही’. मंचावर शाहरुख खान देखील उपस्थित होता. रणबीर कपूरच्या या वक्तव्यावर शाहरुख लगेच म्हणाला, ‘मला देखील कोणी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका विचारली नाही, त्यामुळे आधी ही भूमिका मी करणार’. यावर रणबीरने देखील उत्तर दिले की ‘सर तुम्ही पोलीस अधिकारी बना, मी तुमच्या कॉन्स्टेबलची भूमिका करतो. दोघांच्या या संभाषणावर प्रेक्षकांमध्ये हशा पिकला होता.
जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंग झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी
आजवर बॉलिवूडमध्ये सलमान खान, आमिर खान, संजय दत्त, अजय देवगण, सुनील शेट्टी यासारख्या अभिनेत्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिका केल्या आहेत. ‘सिंघम’, ‘दबंग’ सारखे पोलिसांवर बेतलेले चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. नुकताच ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात सैफ अली खान पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे.
रणबीर कपूर ब्रम्हास्त्रनंतर दिग्दर्शक लव्ह रंजन यांच्या चित्रपटात दिसणार आहे. तसेच कबीर खानचे दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी यांच्या ‘डेव्हील’ या चित्रपटात तो दिसणार आहे. एप्रिल महिन्यात त्याने अभिनेत्री आलिया भटसोबत लग्न केले आहे. रणबीर कपूरचा काही दिवसांपूर्वी शमशेरा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटदेखील बिग बजेट होता मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली होती.