नोरा एफ्रॉनकृत ‘व्हेन हॅरी मेट सॅली’ या रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटाचा फॉम्र्यूला प्रभाव आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा यासाठी आहे की, हॉलीवूड त्यातील समभागांची किंवा घटकांची आवर्तने करीत आहेतच वर बॉलीवूडदेखील ‘प्यार तो होना ही था..’ छापाच्या कैक आवृत्त्या भारतीय प्रेक्षकांसाठी हीट वगैरे करून गेला आहे. म्हणजे या फॉम्र्यूल्यामध्ये नायक आणि नायिका अशक्यरीत्या भेटतात वगैरे.. त्यांच्या मनात एकमेकांवर प्रेम होण्याची किंचितही नसलेली अवस्था उलट गतीने बदलायला लागते वगैरे.. मग प्रेक्षकांच्या डोळ्यांत प्रेमानंदाचे भरते पूर्णपणे भरतीरूपात येते वगैरे.. छानपैकी जुन्याच ग्लासातले नव्या चवीचे पेय किंवा जुन्याच ताटातील वेगळ्या चवीचे खाद्य खाताना जसे होते, तसेच काहीसे ‘द  माऊंटन बिटविन अस’ नामे नव्या रॉमकॉमला अनुभवताना वाटते. रोमॅण्टिक कथेच्या फॉम्र्यूल्यामध्ये अवघड सुटकापटांच्या घटकांना जोडून तयार झालेला हा चित्रपट केट विन्स्लेट आणि इद्रिस अल्बा यांच्या दुपात्री अभिनयाची जुगलबंदी बर्फाळलेल्या एकांतात सादर करतो. गोठणबिंदूहून भयाण परिस्थितीत घडणाऱ्या या प्रेमाची दास्तान परिपूर्ण नसली, तरीही पाहणीय बनली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या सिनेमाचा दिवंगत नोरा एफरॉनच्या रॉमकॉमशी इथे साम्यतुलना होऊ शकते, कारण तिच्यासारख्याच पत्रकार-लेखक असलेल्या चार्ल्स मार्टिन यांच्या हातून ‘द माऊटन बिटवीन अस’ ही कादंबरी लिहिली गेली. २०१० साली न्यू यॉर्क टाइम्सच्या खूपविक्या पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक पडल्यावर त्यावर सिनेमाचा घाट घातला गेला. ‘पॅरेडाइझ नाऊ’ आणि ‘ओमर’ या दोन चित्रपटांमुळे ऑस्करच्या परभाषिक गटात पोहोचून गाजलेल्या इस्रायली दिग्दर्शक हॅनी अबू-असद यांना चित्रपटासाठी पाचारण केल्यामुळे आणि केट विन्स्लेट- इद्रिस अल्बा या तगडय़ांच्या निवडीमुळे यंदा या चित्रपटाकडून उदंड अपेक्षा लागल्या होत्या. अपेक्षेइतक्या शिखरापर्यंत पोहोचला नसला तरी ‘माउंटन बिटवीन अस’ निराश करीत नाही.

दिग्दर्शकाचे दोन्ही परभाषिक चित्रपट आवडणाऱ्यांना या चित्रपटातील संयतपणाचा मुद्दाम घेतलेला प्रवाहही पसंत पडू शकेल. सुरुवातीला चित्रपट अतिवेगातच सुरू होतो. म्हणजे नायक-नायिकेची चौथ्या मिनिटाला ओळख, पाचव्या मिनिटाला एकत्रित प्रवास करण्याचा निर्णय आणि नवव्या मिनिटाला त्यांचे जीवन-मरणाच्या अवस्थेत एकमेकांना वाचविण्याइतपत संकटस्थिती येथे निर्माण होते. इथला नायक बेन (अल्बा) नाणावलेला डॉक्टर आहे. एका अतिमहत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला दुसऱ्या शहरामध्ये विमानाने पोहोचायचे असते, मात्र बर्फवृष्टीमुळे त्याचे विमान रद्द झाल्यामुळे विमानतळावरील विलंबाच्या हतबलतेशी त्याचा झगडा सुरू राहतो. नायिका अ‍ॅलेक्स (विन्स्लेट) ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची छायाचित्र पत्रकार आहे. येथे गंमत म्हणजे ती प्रेम-लग्नाचा तिरस्कार करणारी सरधोपट पत्रकार नाही, तर स्वत:च्या लग्नात हजर राहणे अनिवार्य असल्याने दुसऱ्या शहरामध्ये विमानाने निघालेली घोडवयीन वधू आहे. बेन आणि आपल्याला गाठायचे शहर एकच असल्याने ती आपल्या पत्रकारीय हिशेबांनी स्वतंत्र विमानाची व्यवस्था करते आणि तातडीने त्यांचा प्रवास वादळवाट कापत दुसऱ्या शहरात पोहोचण्यासाठी सुरू होतो. अतिउत्साही आणि युद्धात कामाचा अनुभव असल्याचा गर्व असलेला वैमानिक आपल्या श्वानासह प्रवासाची धुरा वाहतो. पण थोडय़ाच वेळात त्याची गर्वाची हवा विरळ होते आणि विमान दुर्गम बर्फाळ डोंगरामध्ये आदळते. वैमानिक सोडले तर श्वान आणि बेन-अ‍ॅलेक्स आश्चर्यकारकरीत्या बचावतात.

संपर्काची सारी साधने मिटलेल्या आणि शरीर-मनानी जखमी बनलेल्या अवस्थेत मग या दोघांचा बचावप्रवास वेग घेतो. दोन वर्षांपूर्वी ‘रेव्हनंट’ या चित्रपटामध्ये लिओनाडरे डी कॅपरिओच्या बर्फाळ प्रदेशातील बचावकथा अनुभवताना निसर्गदृश्यांची अभूतपूर्व लयलूट करण्यात आली होती. इथली गोष्ट तितक्याच बर्फाळ वातावरणात असली, तरी इथे निसर्गदृश्यांऐवजी कलाकारांच्या मानसिक आंदोलनांना आणि बदलत्या भूमिकांना महत्त्व दिले आहे. आधी पत्रकारीय माज घेऊन वावरणारी अ‍ॅलेक्स आणि जगण्याची शक्यता सोडून दिलेला बेन एकमेकांना जगण्याच्या प्रेरणेचा दिवा दाखवत निरनिराळ्या संकटांना नामोहरम करण्यास सज्ज होतात.

लाइफ ऑफ पाय, कास्ट अवे, रेव्हनण्ट या चित्रपटांशी तुलना करता येण्याजोगी परिस्थिती असलेल्या या चित्रपटामधल्या कथेतील रॉम-कॉम मसाला पुढे कोणत्या वळणावर जाईल, याचा विस्तार परिचित असला, तरी प्रेक्षकाला सुसह्य़ चित्रपटाचा आनंद देणारा आहे. गोठणबिंदू तापमानाखाली नोरा एफ्रॉनकृत हॉलीवूडी प्रेमपटाच्या छटा सापडल्याचा इथला शोधही सुखकारकच ठरू शकतो.