बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने अमेरिकेतील दूरचित्रवाहिनीवरील ‘क्वांटिको’ या मालिकेतील भूमिकेसाठी ‘पीपल्स चॉईस’ पुरस्कार पटकावला. अमेरिकेत पहिल्यांदाच पुरस्कार मिळाल्याने प्रियांका किंचित भावूक झाली. प्रियांकाने आभार प्रदर्शन भाषण देखील केले, पण हॉलीवूड अभिनेता जॉन स्टामोसला प्रियांकाचे भाषण जास्तच लांबत असल्याचे वाटले आणि त्याने भाषणादरम्यान ‘कार्यक्रम फक्त दोनच तासांचा आहे’, असा मिश्किल टोमणा प्रियांकाला लगावला.
प्रियांका क्वांटिको मालिकेत एका एफबीआय एजंटची भूमिका करत असून, अमेरिकन दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकेत काम करणारी आणि पीपल्स चॉईस पुरस्कार मिळवणारी ती पहिली बॉलीवूड अभिनेत्री ठरली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आभार प्रदर्शन करताना प्रियांकाने सर्वांचे आभार व्यक्त करण्यास सुरूवात केली. अमेरिकन इंटस्ट्रीने मोठ्या मनाने आपल्याला स्वीकारल्याबद्दल आभार व्यक्त करत प्रियांकाने तिची आई, मालिकेतील सहकलाकार, व्यवस्थापक, लेखक आणि इतर सर्वांचे आभार व्यक्त करण्यास सुरूवात केली. त्यावेळी प्रियांकासोबत ‘ग्रँडफादर्ड’ मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी पीपल्स चॉईस पुरस्कार मिळालेला अभिनेता जॉन स्टामोस देखील उपस्थित होता. त्याने प्रियांकाचे भाषण लांबत असल्याचे लक्षात आल्यावर सहज खोडकरपणे मिश्किल हास्य करत कार्यक्रम फक्त दोन तासांचा असल्याचे म्हटले. त्यावर प्रियांकाने स्मितहास्य केले. मग, दोघांनीही आवरते घेऊन चाहत्यांना अभिवादन करून निरोप घेतला.
दरम्यान, प्रियांकाला सुप्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता व्हीन डिझेलच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्हीन डिझेलसोबत लवकरच बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.