दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जीवनात आपल्या कामातून सर्वांवरच वेगळी छाप सोडली. त्यांच्या गाण्यात कोणत्याही प्रकारची चुक असणार नाही याची त्या नेहमीच काळजी घेत असत. संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी कोणत्याही प्रकारचा अपशब्द असलेलं एकही गाणं गायलं नाही. या विषयावरून त्यांनी प्रसिद्ध अभिनेता राज कपूर यांच्याशीही वाद घातला होता. पण काही काळापूर्वी निर्माता करण जोहर आणि कियारा अडवाणी यांनी असं काही केलं की संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय या दोघांवर रागावले होते.
‘स्पॉटबॉय-इ’नं दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा करण जोहरची निर्मिती असलेल्या ‘लस्ट स्टोरीज’च्या एका एपिसोडमध्ये लतादीदींचं एक गाणं रि-क्रिएट करण्यात आलं होतं. त्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांनी एक स्टेटमेंट प्रसिद्ध केलं होतं. ज्यात त्यांनी म्हटलं होतं, ‘त्या सीनमध्ये लतादीदींनी गायलेलं भजन अशाप्रकारे वापरण्याची काय गरज होती. त्या ठिकाणी दुसरं कोणतही गाणं वापरता आलं असतं. तुमच्या अभिनेत्रीला अशाप्रकारचा सीन करण्यासाठी लतादीदींच्या गाण्याचा वापर करणं चुकीचं आहे.’
आपल्या स्टेटमेंटमध्ये मंगेशकर कुटुंबीयांनी पुढे म्हटलं होतं, ‘लतादीदींना याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली गेली नव्हती. आता या वयात त्यांच्या गाण्याबद्दल असं काहीतरी केलं जावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही. करण जोहरनं जेव्हा ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटासाठी त्यांचं हे भजन रेकॉर्ड केलं होतं. त्यावेळी त्यानं हे एक स्वप्न असल्याचं म्हटलं होतं. मग कोणी अशाप्रकारे आपलं स्वप्न उद्ध्वस्त करतं का? खासकरून अशाप्रकारच्या परिस्थितीत ते भजन वापरणं चुकीचं आहे.’
दरम्यान कियारा अडवाणी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या वेब सीरिजमुळे बरीच चर्चेत आली होती. या वेब सीरिजमध्ये तिच्यासोबत विकी कौशल महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजचं दिग्दर्शन करण जोहरसोबत, अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी यांनी केलं होतं.