हिंदी चित्रपटसृष्टीतला ‘चेहरा’ मराठीत येणे हे आता शिवनेरीने मुंबई-पुणे प्रवास करणे इतके सोपे झाले आहे. एके काळी अगदी व्ही. के. नाईक यांच्या ‘छक्के पंजे’ या चित्रपटाद्वारे प्रियदर्शिनी हिंदीतून मराठीत आली त्याचीही केवढी चर्चा रंगली. हिंदीत तिने विक्रमसोबत ‘तूफान’मध्ये व इतरही चित्रपटांतून लहानमोठय़ा भूमिका स्वीकारल्या होत्या. ‘आपकी कसम’मध्ये ती राजेश खन्ना-मुमताज या विभक्त पती-पत्नीची मुलगी असते. खरंतर ती मूळची प्रिया वालावलकर व तेव्हा राहायला शिवाजी पार्कात होती. म्हणजे अस्सल मराठमोळी, पण हिंदीच्या पडद्यावरून मराठीत येणारी म्हणून केवढे तिचे कौतुक.
आता तशी परिस्थिती नाही. नेहमी चालणाऱ्या दुकानातच जास्त गर्दी होते, अशा ग्राहकांच्या मानसिकतेनुसार जणू मराठी चित्रपटाला खूप खूप चांगले दिवस आले आहेत. तेव्हा मराठीच्या पडद्यावर जायला काहीच हरकत नाही, असे मानत अक्षरश: कोणीही मराठी चित्रपटाच्या पडद्यावर अथवा तांत्रिक कारागिरीसाठी पडद्यामागेही येते. ज्यांना हे जमत नाही ते मराठी चित्रपट पाहायला येतात. त्यामुळे मराठी चित्रपटाचा नेमका किती व कसा फायदा होतो हे कोडे कोणी सोडवेल का? अलीकडेच हिंदीतील इतक्या जणांनी एका मराठी चित्रपटाच्या खासगी खेळाला हजेरी लावली की त्या चित्रपटाला तेवढय़ा प्रमाणावर प्रेक्षक मिळाले असते तरी तो यशस्वी म्हणून गणला गेला असता. असो. हिंदीवाले मराठीत मिरवणे हे किती फायद्यातोटय़ाचे अथवा ‘फक्त बातमी’पुरते राहते हा विषय खूप गंभीर वाटतो काय हो?
पण आपली माधुरी दक्षित-नेने मराठीत कधी हो येणार?
चांगली पटकथा मिळाली की मराठीत नक्की काम करीन, असे माधुरीने आपल्या मुलाखतींमधून इतक्या वेळा सांगितले की, आता असे वाटू लागले आहे की मराठीत चांगल्या पटकथा असतच नाहीत की काय? आणि माधुरीच्या मते चांगली पटकथा म्हणजे नेमके काय? हिंदीत तिने अशा चांगल्या पटकथेवरचे किती बरे चित्रपट केले?
ते काही असो, माधुरीने अद्याप मराठी चित्रपटांतून भूमिका स्वीकारली नसल्यानेच ही प्रश्नमंजूषा.
पण हा प्रश्न आताच का?
कारण राजश्री प्रॉडक्शनच्या ‘अबोध’ या चित्रपटाला तीस वर्षे झाली (म्हणजे माधुरीचे वय हो किती असा हिशेब मांडू नका) तिच्या इतक्या मोठय़ा वाटचालीत मराठी चित्रपटाने केवढा तरी वळणावळणाचा प्रवास केला, त्यात एकदाही माधुरीला मराठी चित्रपटाची गाडी पकडावी असे का वाटले नाही? विनोदीपटांची लाट ओसरली, सोशिक चित्रपटांचे ‘सासर माहेर’ पुरे झाले (अशा चित्रपटांतून माधुरी अशी कोणी कल्पना तरी केली असती का?) ‘श्वास’पासून मराठी चित्रपटाला ऊर्जितावस्था प्राप्त झाली, ‘दुनियादारी’पासून उत्पन्नाचे अफाट विक्रम होऊ लागले आहेत. ‘टपाल’सारखे वेगळे चित्रपट निर्माण होत आहेत. माधुरीला कधीच ‘मराठीची हाक’ ऐकू आली नाही का?
अगं, मराठीच्या पडद्यावरही ‘झलक दिखला जा’ असे म्हणावेसे वाटते. अधिक उशीर झाला तर मात्र ‘सिनेमा संपता संपता’ माधुरीचा कथेत उशिरा प्रवेश झाला, असे म्हणावे लागेल..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा