पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारणारे अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनतात. त्यांच्या भूमिका इतक्या दमदार असतात आपण त्यांच्याशी नकळतपणे जोडले जातो. ५०-६० च्या दशकात ज्या अभिनेत्री चित्रपटांमध्ये ज्या भूमिका साकारत असत, लोक त्यांना त्याच भूमिकांमुळे लक्षात ठेवायचे. ज्येष्ठ अभिनेत्री मीनू मुमताज त्यापैकीच एक. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच त्या एक अतिशय सुंदर नृत्यांगनादेखील होत्या, पण एक वेळ अशी आली जेव्हा त्यांच्या एका भूमिकेमुळे लोकांना धक्का बसला होता. त्यांनी मोठ्या पडद्यावर स्वतःच्या सख्ख्या भावासह रोमान्स केल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.
मीनू मुमताज १९५० आणि १९६० च्या दशकातील अनेक हिंदी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकांमध्ये नृत्यांगना आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या. २६ एप्रिल १९४२ रोजी जन्मलेल्या मीनू मुमताज यांच्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अनेकांना माहीत नसतील. मीनू मुमताज या अभिनेता मेहमूद अलीची सख्खी बहीण आणि गायक लकी अलीची मावशी होत्या.
आणखी वाचा- Video : स्पर्धकाला पाहताच नेहा कक्करने दिला परीक्षक होण्यास नकार, पाहा नेमकं काय घडलं
मीनू मुमताज यांनी १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘घर घर में दिवाली’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी गावात राहणाऱ्या एका डान्सरची भूमिका साकारली होती. पण त्यांना ओळख मिळाली ती ‘सखी हातिम’ चित्रपटातून. त्यानंतर त्या बलराज साहनीसोबत ‘ब्लॅक कॅट’ (१९५९) मध्ये मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. हळूहळू मीनू यशाची पायरी चढत गेल्या आणि कागज के फूल (१९५९), चौदवी का चांद (१९६०), साहिब बीबी और गुलाम (१९६२), याहुदी (१९५८), ताजमहल (१९६३), गझल (१९६४) यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसल्या. मीनू हे नाव मुमताज यांनी त्यांची वहिनी मीना कुमारी यांनी दिले होते.
मीनू मुमताज यांनी देव आनंदपासून गुरू दत्तपर्यंत अनेक बड्या स्टार्सबरोबर काम केले. त्यांना दीपिका राणीने बॉम्बे टॉकीजमध्ये डान्सर म्हणून संधी दिली होती. मुमताज यांचा भाऊ मेहमूद हा बॉलीवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन होता. मुमताज यांनी त्यांच्या भावासह चित्रपटांमध्येही काम केले होते, त्यानंतर त्यांच्या काही भूमिकांमुळे लोकांनी त्यांच्यावर टीका केली. सख्ख्या भावासह ऑनस्क्रीन रोमान्स केल्यामुळे त्यांना खूप टोमणे ऐकावे लागले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनाही टीकेचा सामना करावा लागला होता.
आणखी वाचा- रणबीर- आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच ओटीटीवर, कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?
सख्खी भावंड असूनही चित्रपटात मुमताज आणि मेहमूद यांना एकमेकांसह रोमान्स करावा लागला. ‘हावडा ब्रिज’ या चित्रपटासाठी त्यांनी एकत्र काम केलं होतं. १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मुमताज आणि मेहमूद मुख्य भूमिकेत होते. अशा परिस्थितीत चित्रपट आणि स्क्रिप्टच्या मागणीमुळे त्यांना पडद्यावर एकमेकांसोबत रोमान्स करावा लागला. चांगले कलाकार असल्याच्या नात्याने दोघांनीही या कामासाठी नकार दिला नाही.
कॉमेडियन जॉनी वॉकर यांच्याशीही मीनू मुमताज यांची जोडीही चांगलीच जमली होती. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले होते. कॉमेडीशिवाय मीनू मुमताज यांनी अनेक सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. ‘फौलाद’ या चित्रपटातही त्या दारा सिंह यांच्यासह काम करताना दिसल्या होत्या.