दिवंगत अभिनेता ऋषी कपूर हे एक उत्तम कलाकार होते हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण यासोबत वेगवेगळ्या कारणांनी ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडले होते. ऋषी कपूर जेवढे प्रेमळ होते तेवढाच त्यांचा स्वभाव तापटही होता आणि त्यांच्या या स्वभावाचा अनुभव त्यांच्यासोबत काम केलेल्या बऱ्याच कलाकारांना आलेला आहे. ऋषी कपूर यांचा मुलगी रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शक करण मल्होत्राला सुद्धा ऋषी कपूर यांच्या तापट स्वभावाचा अनुभव ‘अग्निपथ’ चित्रपटाच्या वेळी आला होता. यावेळी ऋषी कपूर यांनी करणशी फक्त भांडणच केलं नव्हतं तर त्याला शिव्या देखील दिल्या होत्या.
करण मल्होत्राच्या ‘अग्निपथ’ चित्रपटात ऋषी कपूर खलनायकी भूमिकेत दिसले होते. ऋषी कपूर यांच्या या भूमिकेच बरंच कौतुक झालं होतं. ऋषी कपूर यांच्यासोबत काम केलेल्या करण मल्होत्रानं ‘शमशेरा’साठी त्यांचा मुलगा रणबीर कपूरसोबत काम केलं. सध्या या चित्रपटाचं प्रमोशन सुरू असून या दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत ‘शमशेरा’ दिग्दर्शक करण मल्होत्रानं ऋषी कपूर यांच्यासोबत ‘अग्निपथ’च्या शूटिंगच्यावेळी होणारी भांडण, वाद या आठवणींना उजाळा दिला. ऋषी कपूर कशाप्रकारे नेहमीच त्याला नवी आव्हान घ्यायला प्रेरित करायचे आणि स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्यास त्यांच्या वागण्याची कशी मदत झाली हे करणने या मुलाखतीत सांगितलं.
करण म्हणला, “जेव्हा आम्ही ‘अग्नीपथ’चं शूटिंग करत होतो त्यावेळी चिंटू काकांशी माझं नेहमीच भांडण व्हायचं. वाद व्हायचे. मी त्यांच्या सोबतचा हा अनुभव कधीच विसरू शकत नाही. ते नेहमीच मला नवी चॅलेंज द्यायचे. ज्यामुळे माझा विश्वास आणखी मजबूत झाला. त्यांच्याशी माझी भांडणं आणि वाद असे होते. जसं मी माझ्या आई-वडिलांसोबत वाद घालतोय. ते मला शिव्या द्यायचे, ओरडायचे, कधी धक्का मारायचे आणि म्हणयचे तू मूर्ख आहेस, वेड लागलंय तुला. आमचे असे वाद नेहमीच व्हायचे पण त्यात कडवटपणा नव्हता.”
रणबीरसोबत काम करतानाचा अनुभव शेअर करताना करण म्हणाला, “ऋषी कपूर आणि रणबीर कपूर एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहेत. एकीकडे ऋषी कपूर हे खूपच उत्साही, काटेकोर आणि जे असेल ते स्पष्ट बोलणारे व्यक्ती होते. तर दुसरीकडे रणबीर शांत आणि आनंदी राहणारं व्यक्तीमत्त्व आहे. ऋषी कपूर गुपचूप मस्ती करायचे. तर रणबीर खूप चांगला प्रँकस्टार आहे.” दरम्यान रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘शमशेरा’ चित्रपट येत्या २२ जुलैला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात वाणी कपूर, संजय दत्त यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.