रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ‘अ‍ॅनिमल’चं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ८०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात रणबीरच्या बरोबरीनेचे बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हेदेखील सध्या चांगलेच चर्चेत आहेत. चित्रपटावर टीका करणाऱ्यांचा संदीप यांनी चांगलाच समाचार घेतला. आता अशातच संदीप यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. संदीप यांनी आत्तापर्यंत तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे ते म्हणजे ‘अर्जुन रेड्डी’, ‘कबीर सिंग’ आणि ‘अ‍ॅनिमल’. या तीनही चित्रपटांवर प्रेक्षकांनी भरपूर टीका केली. आपल्या या टीकाकारांनाच उत्तर देताना संदीप यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं जे पुन्हा चर्चेत आलं आहे.

आणखी वाचा : ३५ लाख रुपये कमावणाऱ्या अभिनेत्याला नंतर गर्लफ्रेंडकडून घ्यावे लागायचे पैसे; ’12th Fail’ फेम विक्रांत मेस्सीचा खुलासा

ही मुलाखत २०१७ सालची आहे जेव्हा संदीप यांचा पहिला चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा चित्रपट महिला-विरोधी असल्याची चर्चा झाली, इतकंच नव्हे तर यावर बंदी घालायचीही मागणी होत होती. त्यावेळी ‘१०टीव्ही न्यूज तेलुगू’ या चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये संदीप यांनी हॉलिवूडमध्ये जाऊन चित्रपट करण्याबद्दल भाष्य केलं होतं. या चित्रपटावर होणाऱ्या टीकेचा परिणाम पुढील चित्रपटांवर होणार असेल तर यावर एक दिग्दर्शक म्हणून संदीप यांना काय वाटतं असा प्रश्न विचारण्यात आला.

याचं उत्तर देताना संदीप म्हणाले, “जर माझ्या पुढील चित्रपटावरही अशीच टीका झाली तर मी हिंदीत चित्रपट काढेन. माझ्यासाठी भाषेचं बंधन कधीच नव्हतं, मी भोजपुरी, कन्नड, मल्याळम, मराठी, तेलुगू भाषेत चित्रपट काढेन. जर तुम्ही मला भारतात रोखलत तर मी हॉलिवूडमध्ये जाऊन चित्रपट बनवेन. या चित्रपटावरुन एवढा गदारोळ का झाला आहे हेच मला अद्याप समजलेलं नाही.” या मुलाखतीमध्ये संदीप जे म्हणाले तेच त्यांनी पुढे करून दाखवलं. संदीप यांनी ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ हा हिंदी चित्रपट काढला. त्यानंतर आता गेल्यावर्षी संदीप यांनी ‘अ‍ॅनिमल’सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला ज्याने ९०० कोटींहून अधिक कमाई केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When sandeep reddy vanga said he would move to hollywood to make films avn