‘चेन्नई एक्स्प्रेस’ या आपल्या चित्रपटाला मिळत असलेलेला प्रतिसाद अनुभवण्यासाठी सध्या शाहरूख मॉल अणि मल्टिप्लेक्स सारख्या सार्वजनिक ठिकाणी असंख्य चाहत्यांना भेट देत आहे. क्वचितप्रसंगी चाहत्यांना भेटण्यासाठी तो मॉलच्या किंवा मल्टिप्लेक्सच्या बाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या चाहत्यांच्या गर्दीत देखिल सहभागी होत आहे. अशाच एका प्रसंगी सिनेमागृहाच्या बाहेर चाहत्यांच्या गर्दीत सहभागी झाला असताना गर्दीतील एका अज्ञात व्यक्तीने त्याचा मफलर चोरला. ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा दिग्दर्शक रोहित शेट्टीने हा मफलर शाहरूखला भेट म्हणून दिला होता.  चाहत्यांच्या गर्दीत कोणीतरी माझा मफलर खेचून घेतला. रोहीतने चित्रीकरणाच्या दरम्यान हा मफलर मला दिला होता. ज्यानी कोणी हा मफलर घेतला आहे, त्याने तो प्रेमाने वापरावा, असा संदेश  मफलर चेरीला गेल्याने भावूक झालेल्या शाहरूख खानने आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटामुळे एकत्र आलेले शाहरूख आणि रोहित शेट्टी अनेकवेळा एकमेकांबरोबर पाहायला मिळत आहेत. शाहरूखने १० ऑगस्ट रोजी दिलेल्या इफ्तार पार्टीत रोहित शेट्टीने हजेरी लावली होती. त्या आधी ९ ऑगस्ट रोजी रोहितने शाहरूखच्या कुटुंबियांसमवेत इद साजरी केली होती. शाहरूख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने केवळ तीन दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमवत बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.