ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर क्रिकेटविश्वात संपूर्ण जगभरात हळहळ व्यक्त होत आहे. जगातील महान फिरकी गोलंदाज अशी त्याची ख्याती होती. क्रिडाविश्वातील अनेक पराक्रमामुळे शेन वॉर्नला त्याकाळी अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. त्याने स्वत: याबाबतचा खुलासा केला होता.
शेन वॉर्नने २०१५ मध्ये एक मुलाखत दिली होती. यावेळी शेनने त्याला बॉलिवूडमधून ऑफर आल्याची माहिती दिली होती. त्या मुलाखतीत शेन म्हणाला की, “जर माझ्यावर एखाद्या चित्रपटाची निर्मिती होणार असेल तर त्यात ब्रॅड पिट किंवा लिओनार्डो यांपैकी एकाने भूमिका साकारावी. हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांसाठी बनवला जावा.”
शेन वॉर्न हा त्यावेळी क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्यामुळे तो सिनेसृष्टीत पदार्पण करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र काही वर्षांनी त्याने ही चर्चा फेटाळत अशी काहीही योजना नसल्याचे सांगितले होते.
यानंतर काही वर्षानंतर शेनने एकदा बायोपिकवरुनही स्पष्टीकरण दिले होते. त्यावेळी शेन म्हणाला होता की, “एक भारतीय प्रॉडक्शन कंपनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बायोपिक बनवण्यासाठी माझ्या संपर्कात होती. पण करोनामुळे ते काम अर्धवट राहिले. मला आशा आहे की, या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा ते काम सुरु करु. बघू काय होते. त्यावेळीही त्याने ब्रॅड पिट आमि लिओनार्डोने या चित्रपटात भूमिका साकारावी”, अशीही इच्छा त्याने व्यक्त केली होती.
“एका मुलाने याची स्क्रिप्टही लिहिली आहे. त्यावरच ही कंपनी शूट करणार होती. हा चित्रपट मूळचा हॉलिवूड असला तरीदेखील तो भारतासाठी शूट केला जावा. या चित्रपटातून निर्माते माझी कथा सांगण्याचा प्रयत्न करणार होते”, असेही शेन वॉर्नने म्हटले होते.
शेन वॉर्नने १९९२ मध्ये भारताविरुद्ध सिडनी येथे कसोटी पदार्पण केले होते. पहिल्या कसोटीत तो फार काही करू शकला नाही आणि फक्त एक विकेट घेऊ शकला. १९९३ च्या ऍशेस मालिकेपूर्वी, वॉर्न ११ कसोटीत ३२ बळी घेत सरासरी लेग-स्पिनर मानला जात होता. वॉर्नने १९९२च्या बॉक्सिंग-डे कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध ७/५२ अशी कामगिरी केली होती.
दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन
वॉर्नचा खरा खेळ १९९३ च्या ऍशेस मालिकेत समोर आला. त्याने पहिल्या अॅशेस मालिकेत पाच कसोटी सामन्यात २९ विकेट्स घेतल्या. १९९३ च्या ऍशेस कसोटीच्या पहिल्या षटकात, वॉर्नने खेळपट्टीचा फायदा घेतला आणि माईक गॅटिंगच्या लेग-स्टंपच्या बाहेर खेळपट्टीवर खेळलेला एक सुरेख लेग स्पिन टाकला, पण तो ऑफ-स्टंपवर आदळला.