बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये हाय ग्रेड कॅन्सरला झुंज देत होती. तिने या कॅन्सरवर मात केली आणि ती भारतात सुखरुप परतली. परंतु कॅन्सर दरम्यान सोनालीला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असे अनेकदा सोनालीने सांगितले आहे. भारतात परतल्यावर तिने अनेक कार्यक्रमात तसेच मुलाखतीमध्ये कॅन्सरला कसा संघर्ष केला याची माहिती दिली. नेहा धूपियाने तिच्या BFFs with Vogue Season 3 या कार्यक्रमात सोनाली आणि तिच्या खास मैत्रीणी सुझान खान व गायत्री जोशी ओबेरॉय यांना आमंत्रण दिले होते. त्या आंमत्रणाला मान ठेवून त्या तिघी कार्यक्रमाला पोहचल्या होत्या.
कार्यक्रमादरम्यान सोनालीने कॅन्सरशी संघर्ष करतानाचा अनुभव चाहत्यांसह शेअर केला आहे. ती म्हणते, ‘जेव्हा मला कॅन्सर झाल्याचे काळाले तेव्हा मला असं वाटले की मी ट्रेनला जोरात धडकले आहे. त्या रात्री मला जरा ही झोप आली नाही. पण त्या रात्री मी मला झालेल्या कॅन्सरची संपूर्ण माहिती करुन घेतली आणि मी त्याचा स्वीकार केला.’ पुढे ती म्हणते ‘माझ्यासोबतच का? हा प्रश्न विचारण्याची आणि त्यावरून रडण्याची ही शेवटची वेळ आहे. या क्षणापासून माझ्या आयुष्यात आनंदच असणार आहे.’ तिचे हे सकारात्मक उत्त ऐकून अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांना प्रेरणा मिळाल्याचे दिसून येत आहे.
सोनालीच्या कॅन्सरच्या संघर्षात तिच्या पतीने गोल्डी बहलने पाठिंबा दिला होता. ‘गोल्डी आणि माझ्या लग्नाला १६ वर्षे झाली. जेव्हा मला कॅन्सर झाल्याचे कळाले तेव्हा मला जाणीव झाली की मला सर्वात जास्त काळजी त्याचीच आहे’ असं सोनाली म्हणाली.