‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे काशिनाथ यांची भूमिका साकारत आहे. सुबोध भावेच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या चित्रपटात कलाकारांनी दिग्गज कलाकार साकारले आहेत. या कलाकारांचं मेकअप, सेट, वेशभूषा याचीही प्रशंसा होत आहे. पण निळ्या डोळ्यांसाठी लेन्सचा वापर करण्यास त्याने नकार दिला होता. इतकंच नव्हे तर लेन्सच्या भीतीने सुबोधने चित्रपटालाही नकार दिला होता.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुबोध हा लेन्सचा किस्सा सांगितला. ‘मी चित्रपट स्वीकारून परत सोडला होता. दिग्दर्शक अभिजीत देशपांडेने मला पटकथा ऐकवली. मी होकार कळवला आणि पुढचा प्रश्न विचारला की, घाणेकरांचे डोळे तर वेगळे होते ना. मग मी लेन्स वापरून काम करावं असं काही तुझ्यात डोक्यात नाही ना?’ दिग्दर्शक अभिजीत यांनी लेन्सचा वापर करण्यास सांगितल्यावर सुबोधने चित्रपटालाच नकार दिला होता. मी लेन्सचा वापर करणार नाही, तू व्हीएफएक्समध्ये निळे डोळे करून घे असा सल्ला सुबोधने अभिजीतला दिला.
वाचा : बारावीत नापास झालो नसतो तर आज इथं नसतो- सुबोध भावे
व्हीएफएक्समध्ये सुबोधचे काही फोटो वापरून त्याच्या डोळ्यांच्या रंग बदलण्यात आला. पण त्याचा खर्च निर्मात्यांना परवडणारा नव्हता. ‘व्हीएफएक्सचा जो खर्च आहे त्यात दोन मराठी चित्रपटांची निर्मिती होईल,’ असं दिग्दर्शकाने सुबोधला सांगितलं. अखेर सुबोधने विक्रम गायकवाड यांच्या मदतीने लेन्सचा वापर करण्याचा विचार केला. सुरुवातीला वेगवेगळ्या रंगांचे लेन्स मागवण्यात आले आणि कॅमेरासमोर ट्रायल करून पाहिलं. बरेच लेन्स पाहिल्यानंतर काशिनाथ घाणेकरांच्या डोळ्यांच्या रंगाशी जवळपास जाणारा एक लेन्स निश्चित करण्यात आल्याचं सुबोधने सांगितलं.
दिवाळीच्या मुहूर्तावर ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बॉक्स ऑफीसवर त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सुबोधसोबतच सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, प्रसाद ओक, आनंद इंगळे यांच्याही भूमिका आहेत.