टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुर्वणपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. अनेक तरुणांसाठी नीरज हिरो ठरत आहे. नीरजची फॅन फॉलोइंग चांगलीच वाढली आहे. भारतात परतल्यापासूनच नीरज वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसून येत आहे. पण विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्याची नीरजची ही पहिली वेळ नव्हे. सुवर्णपदक जिंकण्याच्या आधीदेखील नीरजने अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे.
एका कार्यक्रमातील नीरज चोप्राचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमाला नीरजने हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता राहुल बोसने देखील उपस्थिती लावली होती.या कार्यक्रमात उपस्थितांपैकी एका तरुणाने नीरजला त्याच्या खेळांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांबद्दल प्रश्न विचारला मात्र या तरुणाने नीरजला इंग्रजीत प्रश्न विचारला. यावर शकडो लोक उपस्थित असतानाही नीरजने न संकोचता तरुणाला हिंदी प्रश्न विचारण्यास सांगितलं. नीरज या तरुणाला थांबवत म्हणाला, “भावा हॅलो हिंदी येते का तुम्हाला? हिंदीत विचारा ” यावेळी राहुल बोसने नीरजला प्रश्न समजावण्यालाठी हात पुढे केला होता. मात्र नीरजने न संकोचता हिंदीत प्रश्न विचारण्यास सांगितलं.
हे देखील वाचा: “पाकिस्तानमुळे अफगाणिस्तानवर ही वेळ आलीय”; अफगाणी पॉपस्टार आर्याना सईदचे आरोप
या कार्यक्रमात तरुणाने खेळामध्ये अडथळे आल्यास किंवा परफॉर्मन्स चांगला होत नसल्यास काय करता? असा प्रश्न नीरजला विचारला होता. यावर नीरज म्हणाला, “हो अनेकदा अशा अडचणी येतात. ज्यामुळे खेळात मागे पडण्याची शक्यता असते. खास करून एखादी दुखापत. कारण एखादी दुखापत झाल्यास २ वर्षां देखील वाया जाऊ शकतात. त्यामुळे दुखापत होवू नये याकडे आम्ही लक्ष देतो. मात्र स्वत:वर विश्वास ठेवून ट्रेनिंग सुरु ठेवणं गरजेचं असतं. यामुळे परफॉर्मन्स देखील चांगला होतो.” असं नीरज म्हणाला.
हरियाणात वाढलेल्या नीरज चोप्राची आपल्या मातीशी नाळ जोडलेली आहे. हिंदी बोलण्यात त्याला कोणताही संकोच वाटत नाही हे या व्हायरल व्हिडीओत दिसून येतंय. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यापासूनच देशभरात नीरजच्या चाहत्यांमध्ये वाढ झालीय. खास करून तरुणींमध्ये नीरजची क्रेस वाढताना पाहायला मिळतेय.