बॉलिवूडची सौंदर्यवती कतरिना कैफ सध्या काय करतेय? तिचा कोणता सिनेमा झळकणार आहे? याची चिंता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. कतरिनाच्या पडद्यावरच्या दर्शनासाठी नेहमीच आसुसलेल्या तिच्या चाहत्यांना २०१३ मध्ये तिने नाराज केलेय. या वर्षी तिचा एकही चित्रपट झळकणार नाहीये. त्यामुळे ‘कतरिना कुठाय’ असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.
कॅटचा एकही चित्रपट यंदा जवळपास वर्षभर झळकणार नसला तरी तिच्याकडे कामच नाही असा मात्र अर्थ नाही. वर्षांच्या शेवटच्या चार दिवसांत ‘धूम : अ‍ॅक्शन अगेन’ या धूम मालिकेतील तिसऱ्या चित्रपटात कतरिना झळकणार आहे. बॉलिवूडची ‘खानावळ’ कॅटबरोबर काम करण्यास नेहमीच उत्सुक असतात. किंबहुना सलमान खाननेच कतरिनाला रूपेरी पडद्यावर आणले हे सर्वश्रुत आहेच. सलमान मियाँसोबत ‘एक था टायगर’ आणि किंग खानसोबत ‘जब तक है जान’ अशा लागोपाठ दोन चित्रपटांतून कतरिना झळकली आणि तिच्या भूमिकेसाठी  नावाजलीही गेली. तिच्या सौंदर्याबरोबरच ‘टायगर.’ मध्ये तिने केलेली स्टण्ट दृश्ये आणि शाहरूखसोबत ‘जब तक है जान’मध्ये यश चोप्रांच्या दिग्दर्शनाखाली अभिनयाची दाखविलेली चुणूक यामुळे कतरिनाचे चाहते सुखावले. हे दोन्ही चित्रपट पाठोपाठ आले आणि सुपरडूपरहिट ठरले. त्यामुळे कतरिनाचा भाव वधारला. आता तिला आणखी चित्रपट मिळणार आणि ती पुढच्या वर्षांत सलगपणे पडद्यावर दिसणार असा अंदाज तिच्या चाहत्यांनी केला खरा. परंतु, २०१३ मध्ये ‘कॅट’चा एकही चित्रपट झळकलेला नाही आणि वर्ष संपायच्या सहा दिवस आधी म्हणजेच २५ डिसेंबरला ‘धूम थ्री’मधून ती दिसेल तेसुद्धा तिसऱ्या खानाबरोबर म्हणजे आमिर खानसोबत. आता म्हणे चित्रपटाचे चित्रीकरण लांबल्याने कदाचित धूम थ्री हा चित्रपट पुढील वर्षांतच प्रदर्शित केला जाणार असल्याची चर्चा आहे. यशराज फिल्म्सची नायिका हा शिक्का मिळवून कतरिनाने आपला दबदबा कायम राखला आहे. दीपिका पदुकोण असो, प्रियांका चोप्रा असो की सोनाक्षी सिन्हा
नंबर वनच्या स्पर्धेत कतरिना कायमच राहील असा विश्वास तिच्या चाहत्यांना आहे. आगामी वर्षांत हृतिक रोशनची नायिका म्हणूनही ती ‘बँग बँग’ या चित्रपटातून झळकणार आहेच.

Story img Loader