‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ या मालिकेतील ‘छू’च्या भूमिकेमुळे गाजलेला पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर एका नाटकाद्वारे पुन्हा लोकांसमोर येत आहे. येत्या १९ तारखेला हे नाटक रंगभूमीवर येण्याची शक्यता आहे. असे असले, तरीही गंगुबाईचा लाडका ‘छू’ नेमका कुठे ‘छू’ झाला, असा प्रश्न कोणालाही पडण्याची शक्यता आहे. या प्रश्नाचे उत्तर स्वत: पॅडीनेच ‘वृत्तांत’शी बोलताना दिले. पॅडी अचानक कुठे गायब झाला, असे त्याला विचारल्यानंतर ‘मी इथेच आहे’, असे उत्तर त्याने दिले. नट असलो, तरीही घरच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. गेले काही महिने मी घरात सगळे स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचबरोबर काही चित्रपटांच्या चित्रिकरणांतही व्यग्र होतो, असे पॅडीने सांगितले. विशेष म्हणजे मधल्या काळात ‘दुनियादारी’ चित्रपटात इतर कलाकारांबरोबर त्याने गाणेही गायले. आता पॅडी तंदुरुस्त होऊन पुन्हा एकदा सगळ्यांसमोर येत आहे. प्रसाद खांडेकर यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेली ‘पडद्याआड’ नावाची एकांकिका ‘सवाई’ नाटय़स्पर्धेत पहिली आली होती. या एकांकिकेने नंतर राष्ट्रीय स्तरावरही पारितोषिके मिळवली. आता ही एकांकिका व्यावसायिक नाटकाच्या रूपात लोकांसमोर येणार आहे. अद्याप नाटकाचे नाव नक्की नसले, तरी पॅडी त्यात प्रमुख भूमिका करणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.