आपण पाहत असलेल्या सिनेमा, टीव्ही मालिकेतील कलाकारांचे आयुष्य नेहमीच एक दिखावा असतो. तो दिखावा संपल्यावरचे त्यांचे माणूसपण हे सामान्य नागरिकांच्या आयुष्यासारखेच असते. फक्त त्यातील चढ-उतारांचे स्वरूप सारखे नसते. सुख-दु:खांची मात्रा किंवा वेदना-संवेदना अनुभविण्यासाठी सेलिब्रेटी किंवा सामान्य असण्याची गरज लागत नाही. ती दोहोंच्या वाटेला सारखीच असते. फक्त ती टाळण्यासाठीचा संघर्ष म्हणजे आयुष्य असल्याचा निष्कर्ष आपण अध्यात्माकडून काढतो. आपल्याकडे एकीकडे अध्यात्मगुरूंच्या थोतांडावर बरेच चर्वितचर्वण होत असताना परदेशात मात्र त्या अध्यात्माचा दाखला देण्याची त्याचा अंगीकार करण्याची असोशी मोठी आहे. तेथे गुरू-बाबा आणि योगसाधना लोकांच्या जगण्याचा भाग बनली असून छोटय़ा अन् मोठय़ा पडद्यावर अध्यात्मसल्ला आपसूक उतरत आहे. ‘हू इज अ‍ॅलिस’ नावाची एक ब्रिटिश फिल्म गेल्या काही महिन्यांपासून विविध महोत्सवांमध्ये गाजत सध्या कल्टहीट बनली आहे. तिचा विषय थेट अध्यात्माशी निगडित आहे. पण ती या साऱ्याकडे फार गमतीने पाहत असल्यामुळे आयुष्याचे तत्त्वज्ञान वगैरे जाणून घेण्यासोबत मुबलक मनोरंजनही येथे पाहायला मिळते.

इथे सिनेमामध्ये मालिका, मालिकेमध्ये पुन्हा सिनेमा आणि पुन्हा चित्रपटाची कथा असा कथानकाचा गमतीशीर प्रकार राबविण्यात आला आहे. येथे नायिका आहे अ‍ॅलिस रिचर्डसन (अ‍ॅली बॅस्टिअन) ही अभिनेत्री. ती मुख्य प्रवाहातील सेलिब्रिटी नाही. ब्लॉकबस्टर सिनेमांऐवजी कलात्मक आणि इंडिपेण्डण्ट सिनेमांमध्ये ती प्रमुख भूमिका करते. पस्तिसाव्या वर्षी तिला आयुष्यात पहिल्यांदा बडय़ा पुरस्कारासाठी नामांकन मिळते. पण या नामांकनादरम्यानच तिचे वास्तव आयुष्य बिघडलेले असते. नवरा दुसऱ्या बाईच्या नादी लागलेला तिला आढळतो आणि लहान मुलीला वेळ न देता आल्याने वैवाहिक आयुष्य संपुष्टात येण्याची चिन्हे निर्माण होतात. नवऱ्यापासून वेगळे राहण्यासाठी  ती लंडनमध्ये भाडय़ाने घर घेते आणि आपल्या सिने-टीव्ही मालिकांमधील कारकीर्दीला पुढे नेण्याचे मनसुबे रचते. त्याच वेळी टीव्हीवर सुरू असलेल्या एका लोकप्रिय मालिकेमध्ये डीक (पॅट्रिक हॉलंड) हा नायक भारतीय अध्यात्मातील पुस्तके वाचून कार कंपनीतील नोकरी गमावतो आणि अस्तित्वाबद्दलच्या गप्पांमधून आध्यात्मिक अवस्थेत आनंद कसा याच्या चर्चा करू लागतो.  लवकरच या टीव्ही मालिकेमध्ये अ‍ॅलिसला नायिकेची भूमिका मिळते आणि मालिकेमधल्या नायकाशी वास्तव आयुष्यात तिचा रोमान्स सुरू होतो. हा रोमान्स कचकडय़ाचा आणि वर पोहोचण्याच्या शिडीसारखा असल्यामुळे लवकरच अ‍ॅलिसला सर्वोत्तम अभिनेत्रीचे पारितोषिक वगैरे मिळते. पण जसे लोकप्रियतेचे शीखर दिसायला लागते, तसे वास्तव आयुष्य अधिक रसातळाला गेल्याचे तिला अनुभवायला मिळते. टीव्ही मालिकेमधील अध्यात्माच्या बाता करणारा नायक डीक वास्तव आयुष्यात मात्र खलनायकालाही लाजविणाऱ्या कृत्यांत सहभागी असतो, याचीही अ‍ॅलिसला प्रचीती येते. परंतु तोवर अ‍ॅलिस वास्तव आयुष्यात प्रेम आणि पैसा या दोन्ही गोष्टींना पारखी झालेली असते.

सावरण्यासाठीचा अखेरचा पर्याय म्हणून ती अभिनयाला सोडून बारटेण्डरचे काम स्वीकारते आणि स्वत:च्या हौसेकरिता लेखन करण्याचा पर्याय स्वीकारते. गोष्टी आणखी बदलाच्या दिशेने सरकू लागतात.

हू इज अ‍ॅलिस हा सिनेमा अनेक प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तरेही अध्यात्माच्या आधारावर देतो. आपले सारे जगणेच दु:ख किंवा आपत्ती टाळण्यासाठी कार्यरत कसे असते, याचे उदाहरण अ‍ॅलिसच्या मार्गाने मिळते. अ‍ॅलिसला सुपरस्टार व्हायचे असते, अन् त्यासाठी ती काहीही करायला तयार असते. आपल्या नवऱ्याची प्रतारणा सहन न करणारी अ‍ॅलिस त्याच्यासोबत वाईट वागण्यासाठी जराही कचरत नाही. चित्रीकरणासाठी ती बहुतांश काळ दुसऱ्या शहरांमध्ये राहते. मुलीला शाळेतून आणण्याची जबाबदारीही नीट निभावू शकत नाही. एवढे करूनही वय उतू जात असल्याने तिच्या मुख्य अभिनेत्रीपदी राहण्याला मर्यादा येऊ लागतात.

लंडनमधील घराशेजारचा संगणककिडा तिच्या प्रेमात पडतो, त्याच्याकडून आपल्याला काही फायदा होत नसल्याचे पाहून ती त्याला दूरच ठेवते. सेलिब्रिटीशी नाते जोडून तिला चर्चेत राहायचे असते. पण ती मनीषा फार काळ न टिकल्यामुळे ती अभिनयाच्या संन्यासाला महत्त्व देते.

अ‍ॅलीस साळसूद नाही किंवा भोळीही नाही. ती आयुष्यात राजकारणाचा वापर करते. ती प्रसिद्धीसाठी स्वत:ला पणाला लावते आणि प्रसिद्धीपासून वेळीच दूरही पळते. कोणत्याही ठिकाणी तिच्या आयुष्यातील दु:ख संपत नाही. कारण अध्यात्माच्या आधारावर पाहिले, तर सुख ही निव्वळ कल्पना असल्याचे अ‍ॅलिसला वाटायला लागते. कोणत्या रूपातील अ‍ॅलिस स्वीकारायची याचा विचार करताना दिग्दर्शक आपण आपले आयुष्य कसे जगायचे ठरवतो त्यावर आपल्या वाटय़ाला वेदना-संवेदनांची अनुभूती मिळते हे बिंबवतो.

या चित्रपटामध्ये हॉलीवूडच्या सिनेमांवर अ‍ॅलिसने मोठी टीका केली आहे. चित्रपट अ‍ॅली बॅस्टिअनच्या एकपात्री भूमिकेने रंगला आहे. अध्यात्माद्वारे सकारात्मक संदेश देणारे चित्रपट बरेच आहेत. हू इज अ‍ॅलिसला संदेश द्यायचा नाही. त्याला या सगळ्याकडे गमतीने पाहायचे आहे. वेगळा म्हणून या चित्रपटाच्या वाटेला जाण्यास हरकत नाही. मनोरंजनाच्या पुरेपूर जागा यात भरपूर आहेत.