बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच लव्हेंडर मॅरेजच्या संकल्पनेवर चित्रपटाची निर्मिती झाली आहे. भूमी पडणेकर आणि राज कुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बधाई दो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्यात एक गे आणि लेस्बियन लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. पण सध्या सोशल मीडियावर भूमी पेडणेकरसोबत तिच्या लेस्बियन पार्टनरची भूमिका साकारणारी अभिनेत्री चुम दरांग बरीच चर्चेत आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री चुम दरांगच्या नावाची सध्या बरीच चर्चा आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहे. भूमीच्या लेस्बियन पार्टनरची भूमिका साकारणारी चुम दरांग ही मूळची नॉर्थ ईस्टची आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला तिच्या दिसण्यावरुन तिला टीकेचा सामना करावा लागला. पण लोकांच्या टीकेकडे लक्ष न देता चुम तिच्या करिअरमध्ये पुढे जात राहिली. पण आता भूमीच्या लेस्बियन पार्टनरची भूमिका साकारत असल्यानं ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मॉडेलिंग जगतात चुमचं नाव प्रसिद्ध आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून केलं होतं ट्वीट
आजही देशाच्या नॉर्थ ईस्ट भागात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या दिसण्यावरुन भेदभावाचा सामना करावा लागतो. त्यांना अनेकदा चिंकी, चायनीज किंवा नेपाळी म्हणून हीनवलं जातं. याच मुद्द्यावरून चुम दरांगनं २०१८ साली पंतप्रधानांना उद्देशून एक ट्वीट केलं होतं. तिने या ट्वीटमध्ये एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती हातात एक बोर्ड घेऊन जमिनीवर बसलेली होती आणि या बोर्डवर ‘मी भारतीय आहे’ असं लिहिलं होतं. आपल्या ट्वीटमध्ये चुम दरांगनं थेट पंतप्रधानांना, ‘अखेर कधीपर्यंत आपल्याच देशातील लोकांना अशाप्रकारे एलियनसारखी वागणूक मिळणार आहे?’ असा प्रश्न केला होता. ‘मी चुम दरांग आहे आणि मी अरुणाचल प्रदेशची रहिवासी आहे.’ असंही तिनं तिच्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं.
दरम्यान चुम दरांगनं याआधी अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. अगदी अक्षय कुमारपासून ते रणवीर सिंहपर्यंत अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत तिनं जाहिरातींमध्ये काम केलं आहे. ती अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या ‘पाताललोक’ या वेब सीरिजमध्येही एका लहानशा भूमिकेत दिसली होती.