प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया सध्या एका मोठ्या वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे रणवीरवर सध्या सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. या शोमध्ये रणवीरने सहभागी स्पर्धकाला विचारलेल्या एका आक्षेपार्ह प्रश्नामुळे त्याच्यासह आयोजकांविरोधात थेट मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
स्टँडअप कॉमेडियन समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो सतत चर्चेत असतो. शोच्या नवीन भागात रणवीर अलाहाबादिया, आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा ही मंडळी आली होती. या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला त्याच्या पालकांच्या प्रायव्हसीबद्दल प्रश्न विचारला. हा व्हिडीओ व्हायरल होताच सध्या रणवीरवर सर्व स्तरांतून टीका होत आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चर्चेत आलेला रणवीर अलाहाबादिया नेमका कोण आहे जाणून घेऊयात…
रणवीर अलाहाबादिया हा प्रसिद्ध युट्यूबर असून तो ‘बीयरबाइसेप्स’ म्हणून देखील ओळखला जातो. त्याचा पॉडकास्ट शो सर्वाधिक चर्चेत असते. अनेक मान्यवरांनी त्याच्या पॉडकास्टला उपस्थिती लावली आहे. त्याने मुंबईतील ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’मधून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर रणवीरने त्याचं उच्च शिक्षण ‘द्वारकादास जे सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ येथून पूर्ण केलं आहे. रणवीरने शाळेत असतानाच युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. तो एकूण तो ७ यूट्यूब चॅनेल चालवतो. ‘बीयरबाइसेप्स’ हे त्याचं युट्यूब चॅनेल चाहत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. या चॅनेलचे तब्बल १२ मिलियन फॉलोअर्स आहेत.
वयाच्या १७ व्या वर्षी, रणवीर उत्सुकतेपोटी पहिल्यांदा दारू प्यायला होता. त्यानंतर इंजिनिअरिंगच्या दिवसांत त्याचं दारूचं सेवन करणं आणखी वाढलं आणि तो कॉलेजच्या पहिल्या वर्षातच नापास झाला. ही गोष्ट रणवीरसाठी टर्निंग पॉइंट ठरली होती. त्याला त्याच्या मद्यपानाच्या सवयींवर नियंत्रण मिळविण्याची प्रेरणा मिळाली. वयाच्या २४ व्या वर्षी, त्याला गुरू भेटले. ज्यांनी त्याला ध्यानधारणा व साधनेची ओळख करून दिली. यानंतर रणवीरने निरोगी आणि जीवनशैलीकडे लक्ष केंद्रीत केलं.
युट्यूबच्या माध्यमातून रणवीरला मोठी कमाई करता येते. डीएनएने दिलेल्या, २०२४ मध्ये त्याची एकूण संपत्ती ६० कोटी होती आणि त्यांचे मासिक उत्पन्न ३५ लाखांपर्यंत आहे. याव्यतिरिक्त, तो टॅलेंट मॅनेजमेंट आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंग एजन्सीमधूनही कोट्यवधी कमावतो. तो मोन्को एंटरटेनमेंटचा सह-संस्थापक देखील आहे. याशिवाय, रणवीरने ‘बीयरबाइसेप्स’ स्किल हाऊस, ‘माइंड बॉडी स्लीप जर्नल’ देखील लॉन्च केलं आहे.