Who Is Manasi Parekh : ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये फीचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दोन अभिनेत्रींना देण्यात आला. एक म्हणजे दाक्षिणात्य अभिनेत्री नित्या मेनन. तिला तमिळ चित्रपट ‘थिरुचित्रंबलम’ मधील तिच्या अभिनयासाठी हा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर अभिनेत्री मानसी पारेख हिला गुजराती चित्रपट ‘कच्छ एक्सप्रेस’ मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना मानसी भावुक झाली. या पुरस्कार सोहळ्यानंतर मानसी चर्चेत आली आहे. प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार विजेती मानसी पारेख ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. या पुरस्कारांच्या निमित्ताने तिच्या दोन दशकांच्या करिअरचा हा घेतलेला धांडोळा.

‘कच्छ एक्सप्रेस’ हा चित्रपट ६ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. यामध्ये मानसी पारेखबरोबरच रत्ना पाठक शाह आणि दर्शील सफारी महत्त्वाच्या भूमिकेत होते. मानसी पारेख या चित्रपटात फक्त मुख्य अभिनेत्री नव्हती, तर या चित्रपटाची निर्मातीही तीच आहे. पतीने विश्वासघात केल्याचं कळाल्यावर एका महिलेचा सक्षमीकरणाचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

मानसीचं बालपण व शिक्षण

मानसी पारेखचा जन्म १० जुलै १९८६ रोजी गुजरातमधील अहमदाबाद इथे सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ कुटुंबात झाला. मानसीला तिच्या आवडीनिवडी जोपासण्यात कुटुंबाची कायमच साथ मिळाली. लहानपणापासूनच मानसीचा कल संगीत व अभिनयाकडे होता. तिच्या या आवडी जोपासण्यासाठी तिला कुटुंबाने कायम प्रोत्साहन दिले. ती शास्त्रीय संगीत शिकली आहे.

70th National Film Awards 2024: मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

मानसीने मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतले. सेंट झेवियर्स मुंबईतील शहरातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक आहे, याठिकाणी तिने इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. महाविद्यालयाने नवोदित कलाकारांसाठी पोषक वातावरण तयार केले होते, त्यामुळे इथे शिकतानाच मानसीच्या कलागुणांना वाव मिळाला. तिने याठिकाणी अभिनय, गायन आणि स्टेज परफॉर्मन्स करून तिची कौशल्ये विकसित केली.

मानसीचं अभिनयक्षेत्रात पदार्पण

अभिनयक्षेत्रात मानसीच्या करिअरच्या सुरुवात टीव्हीपासून झाली. तिने सुरुवातीला अनेक मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. यात ‘कितनी मस्त है जिंदगी’ (२००४) आणि ‘कसौटी जिंदगी की’ (२००५) सारख्या मालिकांचा समावेश होता, या मालिकांमध्ये तिने छोट्या पण महत्त्वपूर्ण भूमिका केल्या होत्या.

२००५ मध्ये ‘इंडिया कॉलिंग’ या टीव्ही शोने मानसीला यश व लोकप्रियता दोन्ही मिळालं. यात तिने चांदिनी नावाची मुख्य भूमिका केली होती. हा शो हिट ठरला व मानसी घराघरांत पोहोचली. यानंतर तिला अनेक नवीन संधी मिळाल्या. २०१०-२०११ या काळात मानसीची ‘गुलाल’ नावाची मालिका आली होती, यात तिने मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका ग्रामीण गुजरातच्या पार्श्वभूमीवर बेतलेली होती. ही मालिका खूप गाजली होती. या मालिकामुळे मानसीचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. या मालिकेनंतर ती आघाडीची टीव्ही अभिनेत्री बनली.

National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना भारत सरकार काय बक्षीस देते? जाणून घ्या

मानसीचा संगीत क्षेत्राती प्रवास व टीव्हीवरील यश

मानसी पारेख उत्तम अभिनेत्री आहे, त्याचबरोबर ती एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका देखील आहे. आपल्या अभिनयाच्या आवडीबरोबर तिने गायनाची आवडही जपली आहे. तिने 2011 मध्ये तिने ‘स्टार या रॉकस्टार’ या शोमध्ये भाग घेतला होता. यात तिने इतर सेलिब्रिटी गायकांशी स्पर्धा केली होती. मानसीच्या मधुर आवाजाने तिला या शोचे विजेतेपद मिळवून दिले होते. यानंतर एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून मानसी ओळखली जाऊ लागली. हा शो जिंकल्यानंतर मानसीने अभिनयाबरोबर गायनावर लक्ष केंद्रित केलं. ती अनेक कार्यक्रमांमध्ये गायिका म्हणून सहभागी होते व सादरीकरण करते.

कच्छ एक्स्प्रेसचा ट्रेलर

मानसीचे चित्रपटांमधील करिअर

मानसीच्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून झाली, पण आपल्या दमदार अभिनयाने ती कालांतराने चित्रपटांकडे वळली. तिने २०११ मध्ये आलेल्या ‘ये कैसी लाइफ’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले, ज्यामध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही, पण हा मानसीसाठी छोट्या पडद्यावरून चित्रपटांमध्ये जाण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता.

मानसीला मोठ्या पडद्यावर २०१९ मध्ये आलेल्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटातून यश मिळालं. तिने यात उत्तम काम केलं होतं, हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि मानसीने इथेही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. असा मानसीचा टीव्ही ते सिनेमा हा प्रवास होता. याशिवाय मानसीने ‘डू नॉट डिस्टर्ब’ नावाची वेब सीरिज केली. यात तिने अभिनय केला होता, तसेच ती सीरिजची सह-निर्माती होती.

70th National Film Awards : राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘वाळवी’ने मारली बाजी! तर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला…; पाहा विजेत्यांची यादी

वैयक्तिक आयुष्य

मानसी पारेखने प्रसिद्ध गुजराती गायक व संगीतकार पार्थिव गोहिलशी लग्न केलं आहे. या दोघांचेही संगीत व कलेवर प्रचंड प्रेम आहे. या जोडप्याला एक मुलगी असून तिचं नाव निर्वी आहे. तिचा जन्म २०१६ मध्ये झाला. मानसी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मानसी तिचे वैयक्तिक आयुष्य व काम दोन्ही यशस्वीरित्या सांभाळत आहे.

मानसीने तिच्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या भूमिका करून मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. ती प्रशिक्षित गायिका आहे. तिने टीव्ही व सिनेमांमध्ये काम करून आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलं. जवळपास दोन दशकांपासून अभिनयक्षेत्रात सक्रिय असलेली मानसी एक कलाकार म्हणून दिवसेंदिवस विकसित होत आहे.

गुजराती चित्रपटांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करायला हवा – मानसी पारेख

गेल्या वर्षी न्यूज18 शोशाला दिलेल्या एका खास मुलाखतीत मानसीने गुजराती सिनेमाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करणं महत्त्वाचं आहे असं म्हटलं होतं. “मला वाटतं की जास्त लोकप्रियता मिळवण्यासाठी गुजराती सिनेमाने अनेक नवीन संकल्पना व कथा शोधायला हव्या. गुजरातमध्ये सुंदर भौगोलिक ठिकाणं आहेत. उदाहरणार्थ, आम्ही जेव्हा कच्छ एक्स्प्रेसचे कच्छमध्ये शूटिंग केले, तेव्हा आम्ही कच्छ दाखवण्याचा प्रयत्न केला कारण तो याआधी कोणत्याही हिंदी किंवा गुजराती चित्रपटात दाखवला गेला नाही. त्याचप्रमाणे गुजराती सिनेमे कसे असतात किंवा गुजराती लोक कसे असतात याविषयी लोकांच्या मनात खूप ठरलेले स्टिरियोटाइप आहेत. त्यामुळे गुजराती चित्रपटांनी त्या रूढीवादी गोष्टी मोडून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या कथा मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपण जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकू,” असं मानसी म्हणाली होती.