दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची आज जयंती आहे. आज जर श्रीदेवी जिवंत असती तर तिचा साठावा वाढदिवस तिने साजरा केला असता. मात्र दुबईत तिचं निधन झालं. तिच्या मृत्यूच्या बातमीने सगळी हिंदी सिनेसृष्टी हळहळली. आज तिच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला सांगणार आहोत की श्रीदेवीची बहीण श्रीलता कोण आहे? तसंच श्रीदेवी आणि तिच्या बहिणीमध्ये प्रचंड वादही झाला होता.
कोण आहे श्रीदेवीची बहीण श्रीलता?
श्रीदेवीबाबत सगळ्यांना ठाऊक आहे. मात्र तिची बहीण श्रीलता ही सुरुवातीच्या काळात श्रीदेवीसाठी महत्त्वाची सपोर्ट सिस्टीम होती. श्रीदेवीचे वडील अय्यपन, आई राजेश्वरी यांच्यासह श्रीदेवीला तिच्या बहिणीचा म्हणजेच श्रीलताचाही बराच पाठिंबा मिळाला. या दोघींमध्ये मालमत्तेचा वाद झाला होता.
श्रीदेवी आणि तिच्या बहिणीमध्ये सुरुवातीला खूप घट्ट नातं
श्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतलं छोटसं गाव असलेल्या मीनामपट्टी या गावात झाला होता. तिचे वडील वकील होते. तर आई गृहिणी होती. श्रीदेवीच्या बहिणीचं नाव होतं श्रीलता. श्रीदेवी आणि तिची बहीण श्रीलता या दोघींमध्ये घट्ट नातं होतं. दोघीही एकमेकींना त्यांच्या सगळ्या गोष्टी, सुख, दुःखं सांगत असत. मात्र नंतर अशा काही गोष्टी घडल्या की या दोघींमध्ये दुरावा निर्माण झाला. श्रीदेवीची बहीण श्रीलता ही तिच्यासह सेटवर जात असे. १९७२ ते १९९३ या दरम्यान ती प्रत्येक सिनेमाच्या सेटवर श्रीदेवीसह दिसली. श्रीदेवीचं सगळं कामकाज ती बघत असे. वयाच्या चौथ्या वर्षापासून श्रीदेवीने आपलं करिअर सुरु केलं होतं. श्रीदेवी जेव्हा घरी डान्स करायची तेव्हा तिची बहीण कॅमेरा घेऊन ते शूट करत असे. मात्र प्रॉपर्टीवरुन एक काळ असा आला की दोघी बहिणींमध्ये विस्तव जात नव्हता.
या दोघींमधल्या वादाचं कारण काय ठरलं?
श्रीलतालाही श्रीदेवी प्रमाणे अभिनेत्री व्हायची इच्छा होती. मात्र ती श्रीदेवीसारखी यशस्वी होऊ शकली नाही. श्रीदेवीच्या आईचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दोन बहिणींमध्ये दुरावा निर्माण झाला. १९९६ मध्ये श्रीदेवीच्या आईचा मृत्यू झाला. त्याआधी त्यांचं एक ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी ते करताना निष्काळजीपणा केला. ज्यानंतर श्रीदेवीने त्या रुग्णालयाच्या विरोधात खटला भरला होता. श्रीदेवी हा खटला जिंकली. तिला नुकसान भरपाई म्हणून सात कोटी रुपये मिळाले. मात्र याचमुळे या दोन बहिणींमध्ये दुरावा आला. श्रीदेवीच्या आईने सगळी संपत्ती श्रीदेवीच्या नावे केली होती. त्यातून नुकसान भरपाईचे जे पैसे मिळाले त्यावरुनही या दोन बहिणींमध्ये वाद झाला. जो वाद इतका वाढला की दोघींनी एकमेकांचं तोंड पाहणंही बंद केलं. नवभारत टाइम्सने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
आपल्याला संपत्तीत वाटा मिळावा म्हणून श्रीलताने श्रीदेवीच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. तसंच श्रीदेवीवर असाही आरोप केला की जेव्हा आईची मानसिक अवस्था चांगली नव्हती तेव्हा श्रीदेवीने सगळी संपत्ती आपल्या नावे करुन घेतली असाही आरोप तिने केला होता. ही केस जेव्हा संपली त्यानंतर श्रीलताला तिच्या वाटणीचे दोन कोटी रुपये मिळाले. असंही सांगितलं जातं की श्रीदेवीचे पती आणि निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांनी हा समझोता घडवून आणला होता. २४ फेब्रुवारी २०१८ या दिवशी श्रीदेवीचा दुबईमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या अंतयात्रेतही तिची बहीण सहभागी झाली नव्हती.