Kunal Kamra Eknath Shinde Controversy Updates : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन आणि सतत वादग्रस्त विनोदशैलीमुळे चर्चेत असलेला कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. राजकीय टीका टीप्पणी करताना त्याने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लक्ष्य केलं. परिणामी एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी त्याचा शो ज्या स्टुडिओमध्ये झाला तिथेच जाऊन तोडफोड केली. दरम्यान, या प्रकरणी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर, तोडफोड प्रकरणी शिवसेनेच्या ११ जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे कुणाल कामरा नक्की कोण? तो सतत वादात का सापडतो? हे जाणून घेऊयात.

कुणालने ११ वर्षे केलंय एकाच कंपनीत काम

कुणाल कामराचा जन्म ३ ऑक्टोबर १९८८ साली झाला. तो पेशाने भारतीय स्टॅण्डअप कॉमेडियन आहे. जीवनातील अनेकविध पैलूंवर तो विनोद करू शकतो. राजकारण, टीव्हीवरील जाहिराती, कॅब ड्रायव्हर, बॅचलर आयुष्य आदी विविध विषयांवर तो दिलखुलास खुमासदार शैलीत विनोद करत असतो. कुणाल कामरा मुंबईत वाढलाय. दादरच्या जय हिंद कॉलेजमध्ये त्याने कॉमर्ससाठी प्रवेश घेतला होता. मात्र, कॉलेजच्या दुसऱ्या वर्षालाच त्याने कॉलेज सोडलं अन् प्रसून पांडे यांच्या अॅड फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये प्रोडक्शन असिस्टंट म्हणून कामाला राहिला. तिथे तो जवळपास ११ वर्षे काम करत होता.

२०१३ मध्ये सुरू केला स्टॅण्डअप कॉमेडीचा प्रवास

२०१३ पासून त्याने स्टॅण्डअप कॉमेडी करायला सुरुवात केली. सुरुवातीला मुंबईच्या कॅनव्हास लाफ क्लबमध्ये तो शो करत असे. पण २०१७ मध्ये युट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या त्याच्या एका व्हिडिओमुळे त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. जुलै २०१७ मध्ये त्याने त्याचा स्वतःचा शो सुरू केला. शट अप या कुणाल नावाच्या या त्याच्या शोमध्ये अनेक राजकारणी लोकांच्या मुलाखत त्याने घेतल्या.

राजकारणी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या घेतल्या मुलाखती

रमित वर्मा या त्याच्या मित्राच्या साथीने तो हा शो करत होता. यामध्ये विविध राजकारणी, विविध चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झले होते. या शोमध्ये राजकारण्यांनी केलेल्या वक्तव्याच्या बातम्याही झाल्या होत्या. जेएनयूचा विद्यार्थी कन्हैया कुमार उमर खालिदही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या व्हिडिओला तासाभरात मिलिअन्स व्ह्युज मिळाले होते. तसंच, अरविंद केजरीवाल, संजय राऊतांसह अनेक राजकीय नेत्यांच्याही मुलाखती या शोमध्ये घेण्यात आल्या होत्या.

मी पत्रकार नाही, पण…

२०१८ मध्ये इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, “मी पत्रकार नाहीय. समाजात बदल घडवून आणणारा चळवळीतील कार्यकर्ताही मी नाहीय. मी फक्त एक कंटेट क्रिएटर आहे. आणि हे सर्व चांगले कंटेट आहे. इतर कोणत्याही विषयांवर बोलण्यापेक्षा मला या विषयांवर माझं मत मांडायला आवडतं. कदाचित ती मतं पक्षपातीही असू शकतात”, असंही कुणाल कामरा म्हणाला होता.