टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. येत्या २७ जानेवारीला मौनी तिचा बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारसोबत गोव्यात लग्न करणार आहे. मौनीच्या या डेस्टिनेशन वेडिंगची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. पण त्याहून जास्त चर्चा आहे ती तिचा बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारची. सूरज नाम्बियार कोण आहे? तो काय करतो? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
मौनी रॉयचा बॉयफ्रेंड सूरज नाम्बियार हा दुबईमध्ये राहणारा बिझनेसमन आणि बँक इन्व्हेस्टर आहे. त्यांचा जन्म बंगळुरू येथे जैन कुटुंबात झाला. सध्या सूरज हा दुबईमध्ये राहतो. सूरजचं शालेय शिक्षण इन्टरनॅशनल रेसिडेन्शियल स्कूलमधून पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्यानं २००८ मध्ये बंगळुरूच्या आरवी कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधून सिव्हिल इंजिनियरिंगची डिग्री घेतली. याशिवाय सूरजनं स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीमधून इन्व्हेस्टमेंट सायन्स आणि इंटरनँशनल मँनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आहे.
सूजरला ट्रॅव्हलिंग आणि बाइक रायडिंगची आवड आहे. हे त्याचं सोशल मीडियावर प्रोफाइल पाहिल्यावर लक्षात येतं. मौनी रॉय आणि सूरज नाम्बियार यांची ओळखही दुबईमध्ये झाली होती. सुरुवातीला त्यांच्यात असलेली मैत्री नंतर प्रेमात बदलली आणि या दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. दरम्यान या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही. मात्र अनेक पार्ट्यांमध्ये हे दोघंही एकत्र दिसले आहेत.
दरम्यान सूरज नाम्बियार हा मौनी रॉयचा बालपणीचा मित्र असल्याचंही बोललं जातं. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमुळे सुरू झाल्या होत्या. २०१९ साली मौनीनं शेअर केलेल्या काही व्हेकेशन फोटोनंतर हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण नंतर मौनीनं हे फोटो डिलिट केले होते. मौनीच्या कामाबद्दल बोलायचं तर तिने यशस्वी टीव्ही करिअरनंतर बॉलिवूडमध्येही पाऊल टाकलं. ‘गोल्ड’, ‘मेड इन चायना’ या चित्रपटांनंतर आता ती लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या बहुचर्चित चित्रपटात दिसणार आहे.