महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘बाजीराव-मस्तानी’ या प्रेमकहाणीने संजय लीला भन्सालीला खुणावले आहे. या प्रेमकथेवर चित्रपट काढण्याच्या विचारात भन्साली आहे. वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन त्यांनी हा विषय पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण कलाकारांचा योग जुळून आला नाही. बॉलिवूडमधील चर्चेनुसार दीपिका पदुकोणने चित्रपटात ‘मस्तानी’ रंगविण्यास नकार दिल्यामुळे भन्साली यांनी आता पुन्हा एकदा नव्याने मस्तानी आणि बाजीरावाचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे.  
‘हीर-रांझा’, ‘जोधा-अकबर’, ‘रझिया सुलताना-याकुत’, ‘सलीम-अनारकली’, ‘देवदास-पारो’ अशा अनेक जोडय़ांच्या प्रेमकथा प्रसिद्ध आहेत. यापैकी बहुतांश प्रेमकथा हिंदी चित्रपटात येऊन गेल्या आहेत. त्यात आता ‘बाजीराव-मस्तानी’ची भर पडणार आहे.
संजय लीला भन्साली यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी या विषयावर हिंदी चित्रपट तयार करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले. त्यावेळी त्यांनी बाजीराव आणि मस्तानी च्या भूमिकेसाठी अनुक्रमे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना घ्यायचे ठरविले होते. पण ते काही जमले नाही. त्यानंतर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांना घेऊन चित्रपट तयार करण्यावर विचार सुरू केला. पण तो ही योग जुळून आला नाही. आता पुन्हा एकदा भन्साली यांनी या विषयावर गंभीरपणे काम करण्यास सुरुवात केली. ‘मस्तानी’च्या भूमिकेसाठी त्यांनी दीपिका पदुकोणला विचारलेही. पण तारखांचे गणित न जुळल्यामुळे दीपिकाने नकार दिल्याची चर्चा आहे. दीपिका सध्या ‘शुद्धी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.
त्यामुळे आता ‘मस्तानी’ बरोबरच ‘बाजीराव’च्या भूमिकेसाठीही भन्साली यांनी जोमाने शोध सुरू केला आहे. ‘बाजीराव’च्या भूमिकेसाठी शाहरुख खानसह रणबीर सिंगच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्याबरोबरच बाजीराव पेशवे यांची पत्नी ‘काशीबाई’ यांची व्यक्तिरेखाही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे या भूमिकेसाठीही ते अभिनेत्रीच्या शोधात आहेत. सर्व काही जुळून आले तर बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावर महाराष्ट्राच्या इतिहातील ‘बाजीराव मस्तानी’ची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा