रेश्मा राईकवार

‘पिस्तुल्या’, ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या तीन मराठी चित्रपटांनंतर थेट हिंदी चित्रपट दिग्दर्शित करायचं तेही अमिताभ बच्चन यांना मुख्य भूमिकेत घेऊन.. हे स्वप्न सत्यात उतरवत असतानाच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे. ज्या ‘केबीसी’मध्ये खुद्द अमिताभ बच्चन या आपल्या आवडत्या नायकाबरोबर कमीत कमी एक पडाव जिंकेपर्यंत तरी खेळायला मिळावं असं स्वप्न नागराजने पाहिलं होतं, आज त्याच शोच्या ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील मराठी अवताराची सूत्रं नागराज मंजुळे यांच्या हाती आली आहेत. ‘बच्चन’ नावाचा हा आपल्या आयुष्यातील योगायोग आणि नवनव्या संधी अनुभवणं खूप मजेशीर असून त्यानिमित्ताने स्वत:त बदल घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नागराजने सांगितले.

सर्वसामान्यांतून नायक-नायिकांचे चेहरे घडवणाऱ्या या अफलातून दिग्दर्शकाला ‘कोण होणार क रोडपती’चे सूत्रसंचालन करणार का? अशी ‘सोनी मराठी’कडून विचारणा झाल्यावर त्याची नेमकी प्रतिक्रिया काय होती हे सांगताना हा माझा आवडता शो आहे, याची कबुली त्याने पहिली दिली. मुळात मी टेलिव्हिजनवर काही करू शकलो असतो असं मला वाटत नाही. मालिका नाही, कुठल्या शोसाठी परीक्षक म्हणूनही मी तयार झालो नसतो. कारण कोणाचं परीक्षण करणं मला आवडत नाही, पण ‘कौन बनेगा करोडपती’ या शोची गंमतच वेगळी आहे. मी वीस र्वष हा शो बघत आलो आहे. त्या वेळी या शोमध्ये बच्चन यांच्यासमोर निदान काही प्रश्नांची उत्तरे देता आली तरी समाधान होईल, असं वाटायचं. त्यामुळे आता जेव्हा या शोसाठी विचारणा झाली तेव्हा ते सगळंच आठवलं आणि गंमत वाटली, असं नागराज म्हणतो. अर्थात, हा खेळ एका अर्थी सर्वसामान्यांच्या स्वप्नांशी जोडला गेलेला आहे. या खेळाचं निश्चित असं एक स्वरूप आहे, त्यात कुठेही थिल्लरपणा नाही आणि या खेळातून पैसे जिंकल्यानंतर त्यांची स्वप्नपूर्ती होणार आहे, म्हणून हा शो महत्त्वाचा वाटतो आणि त्याच्याशी जोडलं जाणं हे आनंददायी असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

अभिनेता, दिग्दर्शक दोन्ही भूमिकांमधून नागराजला प्रेक्षकांनी पाहिलं आहे, मात्र सूत्रसंचालक म्हणून तो पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा संख्येने टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकवर्गासमोर येणार आहे. पण त्याला याचं दडपण वाटत नाही. मला लोकांशी बोलायला खूप आवडतं. तो माझा स्वभाव आहे. त्यामुळे  सूत्रसंचालक म्हणून मी संवाद साधू शकेन, याबद्दल मला विश्वास होता. आणि बाकी मी हे सगळंच निभावू शकेन, असा विश्वास एकूणच वाहिनीच्या टीमला असल्याने या शोच्या तयारीत पूर्णपणे उतरलो असल्याचे त्याने सांगितले. ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो आणि अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन हा एकंदरीतच ग्लॅमरस प्रकार राहिला आहे. त्याचा विचार करता आजवर साधेपणाने वावरणाऱ्या नागराजची स्टाइल, त्याचा लुक याबद्दल उत्सुकता आहेच. आणि तीच या शोची खरी गंमत आहे, असं तो म्हणतो. ‘कोण होणार करोडपती’ या शोचं स्वरूप हे एकदम सुंदर, नीटनेटकं, चकचकीत असं आहे. आणि त्यात मी पडलो वेडावाकडा माणूस. या दोन विरोधी गोष्टींना एकत्रित आणण्यातून जे निष्पन्न होणार आहे तोच एक अनुभव असेल, असं नागराज म्हणतो.

या शोच्या निमित्ताने, तसंच मराठीतून हिंदीत दिग्दर्शक म्हणून येताना स्वत:त आंतर्बाह्य़ बदल घडवण्याची गरज वाटते आहे, असं त्याने सांगितलं. ‘कोण होणार करोडपती’ हा शो एकंदरीतच ज्ञानाधारित शो आहे. त्यामुळे या शोसाठी सातत्याने अपडेट राहणं हे गरजेचं वाटतं आहे. पुन्हा या शोसाठी एरव्ही कॅमेऱ्यामागे उभं राहून इतरांना सूचना देणारा मी आज कॅमेऱ्यासमोर आलो आहे आणि मलाही तशाच सूचना मिळतायेत. त्यामुळे हेही तांत्रिक अंग शिकून घेणं, ज्ञान वाढवणं, व्यक्तिमत्त्वातला बदल आत्मसात करणं या गोष्टींवर भर देत असल्याचेही त्याने सांगितले.

मराठीतून हिंदीकडे दिग्दर्शक म्हणून प्रवास करताना आपलं अनुभवविश्व विस्तारत जातं, पण याचा अर्थ आपला दृष्टिकोन बदलतो असं होत नाही. त्यामुळे ‘झुंड’सारख्या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम क रतानाही दिग्दर्शक म्हणून आपली शैली बदलणार नाही, हे तो विश्वासाने सांगतो. हिंदीत गेलो म्हणजे तसाच तद्दन व्यावसायिक चित्रपट करणार असं होत नाही. मात्र प्रत्येक माध्यमाचा अनुभव वेगळा असतो. तसा तो हिंदी चित्रपट करण्याचा अनुभव वेगळा आहे, आता टीव्ही माध्यमात काम करतोय तर त्याचीही गणितं वेगळी आहेत, हे सगळं समजून घेतो आहे, असं नागराज म्हणाला.

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचं स्वप्न इतक्या लवकर पूर्ण झालं. त्यांनीच लोकप्रिय केलेल्या शोचा भाग होण्याची संधी मिळाली, याबद्दल विचारलं असता आयुष्यात या ज्या अतक्र्य, आपल्या अवाक्याबाहेरच्या वाटणाऱ्या गोष्टी अचानक शक्य होतात. तुम्ही कुठलीही अपेक्षा केलेली नसते, तुम्ही फक्त काम करत राहता आणि अचानकपणे त्या संधीच्या रूपात तुमच्यासमोर येतात तेव्हा खरंच विचार करावासा वाटतो. आयुष्यातली ही अनिश्चितता, घडणारे योगायोग हे फार रंजक असतात. सध्या तरी मी ही रंजकता अनुभवतोय, असं नागराजने सांगितलं.

के बीसीच्या मराठी अवतारासाठी सूत्रसंचालन करत असल्याचं अमिताभ बच्चन यांना सांगितल्यावर त्यांनाही आनंद वाटला, त्यांनीही या नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्याचे त्याने सांगितले. एकंदरीतच हा लोकप्रिय शो तितक्याच चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असं सांगतानाच या शोमुळे माझ्यात बदल होतोच आहे. आता माझं हे वेगळेपण ‘कोण होणार करोडपती’ला आणि पर्यायाने प्रेक्षकांना काय वेगळं देणार? ही उत्सुकता जेवढी प्रेक्षकांना आहे तेवढीच ती मलाही असल्याचे तो मोकळेपणानं म्हणाला.

‘नागराजचे व्यक्तिमत्त्व हे या शोच्या स्वरूपाला साजेसे ’

‘कोण होणार करोडपती’ हा शो ‘सोनी मराठी’वर आणताना त्याचा चेहरा ठरावीक ठोकताळ्यांमधून आलेला नसावा, हाच पहिला विचार होता. याचा मूळ शो आहे तो वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तबगार व्यक्तींनीच सूत्रसंचालक म्हणून गाजवला होता. त्यामुळे एखादा कलाकारच या शोसाठी हवा, हे बंधनच नव्हतं. दुसरं म्हणजे हा शो पहिल्यापासून सर्वसामान्यांशी जोडला गेलेला आहे. ते आपली स्वप्न घेऊन इथे स्पर्धक म्हणून खेळ खेळण्यासाठी येतात. नागराज मंजुळेंनी दिग्दर्शक म्हणून आत्तापर्यंत सर्वसामान्यांमधूनच कलाकार घडवले आहेत. त्यामुळे तो प्रेक्षकांशी जोडला गेलेला दिग्दर्शक आहे, तो प्रत्येकाशी उत्तम संवाद साधतो, त्यांचे म्हणणे आत्मीयतेने ऐकतो. त्याचा हा स्वभाव, त्याचं व्यक्तिमत्त्व हे शोला साजेसं वाटल्यानेच आम्ही त्याची निवड केली.

  • अजय भालवणकर,  व्यवसाय प्रमुख, सोनी मराठी

Story img Loader