Allu Arjun : अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ बॉक्स ऑफिस गाजवत आहे, मात्र याच सिनेमामुळे तो अडचणीत सापडला. शुक्रवारी (१३ डिसेंबरला) पोलिसांनी त्याला अटक केली. संध्याकाळी त्याला तेलंगणा हायकोर्टाने जामीन मंजूर केला, मात्र तरीही त्याला एक रात्र तुरुंगात राहावं लागलं. आज (शनिवारी, १४ डिसेंबरला) सकाळी त्याची सुटका झाली. जामीन मिळूनही अल्लू अर्जुनला तुरुंगात रात्र का घालवावी लागली? ते जाणून घेऊयात.
अल्लू अर्जुनला त्याच्या ‘पुष्पा 2: द रुल’च्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली. हैदराबाद येथील स्थानिक न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. अभिनेत्याला पाहण्यासाठी त्याचे चाहते मोठ्या संख्येने कारागृहाबाहेर जमले होते. मात्र, त्याला शुक्रवारी नाही तर शनिवारी सकाळी सोडण्यात येईल, असं सांगण्यात आलं.
हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला तरी जीव गमवावा लागत असेल तर…”
अल्लू अर्जुनला जामीन मिळूनही तुरुंगात का राहावं लागलं?
शुक्रवारी उशिरापर्यंत तुरुंग अधिकाऱ्यांना जामिनाची प्रत मिळाली नव्हती, त्यामुळे हायकोर्टाने जामीन देऊनही अभिनेत्याला रात्र तुरुंगात काढावी लागली, अशी माहिती तुरुंगातील सूत्रांनी पीटीआयला दिली. तसेच अंतरिम जामीन आदेशात त्रुटी होती, त्यानंतर एक नवीन आदेश जारी करण्यात आला, जो शुक्रवारी रात्री उशिरा कारागृहात पोहोचला. आला. जामिनाच्या प्रतीची तपासणी करणं आवश्यक होतं, त्यामुळे अभिनेत्याची शुक्रवारी सुटका करणं शक्य नाही, असं तुरुंग प्रशासनाने नमूद केलं.
हेही वाचा – Video: अल्लू अर्जुनची अटक प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया, हात जोडत म्हणाला…
टास्क फोर्सचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त यांनी शुक्रवारी रात्री उशिरा पत्रकारांना अभिनेत्याच्या सुटकेबद्दल माहिती दिली. “उद्या सकाळी (शनिवारी) अल्लू अर्जुन सोडण्यात येईल,” असं ते म्हणाले होते.
अल्लू अर्जुनच्या वकिलांनी केली टीका
अल्लू अर्जुनचे वकील अशोक रेड्डी यांनी हैदराबाद तुरुंग अधिकाऱ्यांवर जामीन आदेशाचे पालन न केल्याबद्दल टीका केली. पीटीआयशी बोलताना रेड्डी म्हणाले, “तुम्ही सरकार आणि संबंधित विभागाला प्रश्न विचारायला पाहिजे की त्यांनी अल्लू अर्जुनची सुटका का केली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशात स्पष्ट लिहिलंय की ज्या क्षणी तुम्हाला (तुरुंग अधिकाऱ्यांना) आदेश मिळेल, लगेच त्याला सोडण्यात यावं. स्पष्ट आदेश असूनही त्यांनी सुटका केली नाही, याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल. ही अटक बेकायदेशीर आहे आणि आम्ही यासंदर्भात कायदेशीर पावले उचलू.”
हेही वाचा – अल्लू अर्जुन तुरुंगातून सुटल्यावर पत्नीला अश्रू आवरेना, मिठी मारून रडू लागली स्नेहा रेड्डी, Video Viral
े
अल्लू अर्जुनला शनिवारी सकाळी सोडण्यात आलं. त्यानंतर तो हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील त्याच्या घरी गेला. घराबाहेर त्याने चाहत्यांची भेट घेतली. सर्वांचे आभार मानले, तसेच घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. घडलेली घटना दुर्दैवी होती, या प्रकरणाच्या तपासात पूर्ण सहकार्य करणार, असं अल्लू अर्जुन म्हणाला. त्यानंतर त्याने पत्नी स्नेहा रेड्डी व मुलांची भेट घेतली.