प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं आज (१६ फेब्रुवारी २०२२ रोजी) निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते. बप्पी लहरी यांच्या निधनासंदर्भात अनेकांनी सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केलाय. भारतीयांना डिस्को गाण्यांची ओळख करुन देणारा आणि त्याबद्दल प्रेम निर्माण करणारा संगीतकार आपल्यातून निघून गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय. बप्पीदा नावाने लोकप्रिय असणारे बप्पी लहरी हे त्यांच्या गाण्यांबरोबरच कपडे आणि सोन्याच्या दागिण्यांबद्दल असणाऱ्या आवडीसाठीही चर्चेत असायचे. मात्र बप्पीदा एवढं सोनं का घालायचे माहितीय का?
बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे त्यांच्या कलागुणांसोबतच हटके फॅशन सेन्ससाठी ओळखले जातात. असे काही मोजके कलाकार वेगवेगळ्या पिढ्यांसाठी ट्रेण्ड सेटर ठरतात. अशाच कलाकारांमध्ये प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचा देखील समावेश होता. त्यांनी त्यांच्या गाण्यांनी अनेकांची मने तर जिंकलीच पण त्याचसोबत त्यांचे सोन्यावरील प्रेम हे देखील सर्वांसाठी कुतुहलाचा विषय ठरायचा. त्यांच्या अंगावर कायम सोन्याचे दागिने असायचे. पण ते एवढे दागिने का घालायचे याबद्दल त्यांनीच एकदा खुलासा केला होता.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: सोन्याच्या दागिण्यांवरील प्रेम, आलिशान गाड्या, मुंबईतील घर अन्…; ‘गोल्डन मॅन’ बप्पीदांची एकूण संपत्ती किती?
बप्पीदांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ साली पश्चिम बंगालमध्ये झाला. वयाच्या २१ व्या वर्षापासून ते बॉलिवूडमधील चित्रपटांना संगीत देऊ लागले. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगीत देत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढू लागली. बप्पीदांनी ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘हिम्मतवाला’, ‘साहेब’, ‘गुरू’, ‘घायल’, ‘रंगबाज’ या चित्रपटांनाही संगीत दिलं. विशेष म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्या सोन्याचा दागिन्यांचीही चर्चा होऊ लागली. सामान्यपणे महिलांना सोन्याची आवड असते अशी मान्यता असणाऱ्या कालावधीमध्ये बप्पीदा अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सोन्याचे मोठ्या आकाराचे दागिने घालून यायचे.
याच सोन्यावरील प्रेमाबद्दल एका मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलं होतं. तुम्ही एवढे सोन्याचे दागिने का घालता? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला तेव्हा त्यांनी याबद्दल खुलासा केलेला. यावर उत्तर देताना ते म्हणाले होते, “हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेसली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम गळ्यात सोनसाखळी घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकंच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असं ठरवलं होतं. त्यातच मला असं वाटतं की सोनं माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोन्याचे दागिने घालतो.” इतकच नाही तर पुढे बोलताना बप्पीदांनी, “गाण्यासोबत सोन ही माझी वेगळी ओळख झाली आहे,” असंही सांगितलं होतं.