बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेमध्ये दाक्षिणात्या चित्रपटांनी गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. बहुदा तिथपासूनच बॉलिवूड आणि साऊथ वादाला तोंड फुटलं. दाक्षिणात्य स्टार महेश बाबू, किच्चा सुदीप यांनी काही वादग्रस्त विधानं करत कलासृष्टीमध्ये वादग्रस्त वातावरण निर्माण केलं. त्यानंतर बॉलिवूडकरांनीही बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर आपलं मत मांडलं. आता अभिनेता अक्षय कुमारने देखील या वादावर आपलं मौन सोडलं आहे.


अक्षय वादग्रस्त विषयांपासून लांबच असतो. पण यावेळी त्याने कलासृष्टीमध्ये सुरु असलेल्या बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर बोलणं पसंत केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अक्षयला बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर विचारण्यात आलं. यावेळी तो म्हणाला, “देशाला विभागू नका. दक्षिण भारत, उत्तर भारत किंवा बॉलिवूड याबद्दल बोलूच नका. जर काही लोक असं बोलत असतील तर तुम्हीपण तेच बोलू नका. लोक काय बोलतात याची मला मुळीच पर्वा नाही. भारतीय चित्रपटसृष्टी ही एकच आहे असं माझं म्हणणं आहे. इंग्रजांनीही तेच केलं. त्यांनी भारताला विभागलं. पण आपण देशाला काय देऊ शकतो याकडे तुम्ही अधिक भर द्या. आपण सगळे एक आहोत. आपले तसेच त्यांचे चित्रपटही चालावेत त्यातून आपल्यालाच फायदा मिळू शकतो.”

आणखी वाचा – अभिनेत्री कंगना रणौतला झटका, कोट्यावधी रुपये खर्च करूनही ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉप

गेल्या बऱ्याच दिवसांपासून या वादाची चर्चा रंगत असताना अक्षयने यापासून लांबच राहण्याचं पसंत केलं होतं. पण आता आपण सगळे एक आहोत असं म्हणत वाद करणं टाळावं असं अक्षयचं म्हणणं आहे. साऊथ विरुद्ध बॉलिवूड हा वाद संपायचं काही नाव घेत नाही. दरम्यान मागच्या काही दिवसांमध्ये हा वाद अधिकच वाढला.

आणखी वाचा – VIDEO : ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची जादू, अभिनेत्रीवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

अक्षयचा येत्या ३ जूनला ‘पृथ्वीराज’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये तो पृथ्वीराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबरीने मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ही या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा रंगत आहे. पण बॉक्सऑफिसवर हा चित्रपट कितपत सुपरहिट ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader