Actor Vikram Gokhale Birth Anniversary:विक्रम गोखले म्हणजे एक चतुरस्र अभिनेते. त्यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या घरातच अभिनयाचा वारसा होता. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले असा वारसा त्यांच्या घरात होता. त्यांनी वयाच्या २६ व्या वर्षापासून काम करण्यास सुरुवात केली. अभिनेता ते चरित्र अभिनेता अशी त्यांची कारकीर्द खूप मोठी ठरली. मात्र याच विक्रम गोखलेंनी सात वर्षांसाठी मनोरंजन क्षेत्रातून संन्यास घेतला होता. तसंच काशीनाथ घाणेकरांना म्हणजेच मराठी रंगभूमीवरच्या सुपरस्टारला विक्रम गोखले अभिनेताच मानत नव्हते. आज विक्रम गोखले यांची जयंती आहे. त्याच निमित्ताने जाणून घेऊ त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी.
उत्तम अभिनेते म्हणून ओळख
विक्रम गोखले यांची नाट्यसृष्टी, मालिका विश्व आणि चित्रपटसृष्टीतली कारकीर्द चार दशकांहून अधिक काळाची आहे. ‘बॅरिस्टर’ या नाटकात त्यांनी केलेली भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. आपल्या अभिनयाचे असे रंग त्यांनी या भूमिकेत भरले होते की ती भूमिका तितक्या उत्कृष्ट पद्धतीने कुणाला वठवता आली नाही. नाटकातल्या संवादांमधले त्यांचे पॉजेस हा चर्चेचा विषय होता. संवाद साधत असताना विशिष्ट पद्धतीने पॉज घेतला तर अधिक प्रभावीपणे आपण आपलं म्हणणं मांडू शकतो यावर त्यांचा विश्वास होता. ‘कथा’ , ‘कमला’, ‘के दिल अभी भरा नहीं’, ‘नकळत सारे घडले’, ‘मकरंद राजाध्यक्ष’, ‘मी माझ्या मुलांचा’ अशा अनेक नाटकांमधून त्यांनी आपली रंगभूमीवरची कारकीर्द विक्रम गोखले यांनी गाजवली. विक्रम गोखले यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं. ‘गोदावरी’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमात त्यांच्या तोंडी ‘मारुतीच्या पायाला पाणी लागलं का?’ इतकी एकच ओळ अनेकदा आहे. मात्र त्यातूनही त्यांनी आपले अभिनय विशेष गुण दाखवून दिले आहेत.
मराठी चित्रपटांची यशस्वी कारकीर्द
‘कळत नकळत’, ‘वजीर’, ‘माहेरची साडी’, ‘महानंदा’, ‘लपंडाव’ अशा एकाहून एक मराठी चित्रपटांमधूनही विक्रम गोखलेंनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. ‘कळत नकळत’ सिनेमातला ‘देव कुणीच नसतो..’ हा संवाद तर त्यांनीच म्हणावा. मराठीप्रमाणेच हिंदीतही त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं. ‘खुदा गवाह’, ‘अग्निपथ’, ‘हे राम’, ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. विजया मेहतांच्या अभिनय कार्यशाळेच्या मुशीत विक्रम गोखले घडले होते. त्यामुळे अभिनय करणं आणि जी भूमिका करतो आहोत तिला न्याय देणं हे तर ओघाने आलंच. ‘वजीर’ सिनेमातला त्यांचा एकट्याच्या तोंडी असेला जो संवाद आहे तो तर आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
१९८२ ते १९८९ या कालावधीत मनोरंजन क्षेत्र सोडून शेती का करत होते विक्रम गोखले?
या विषयी विक्रम गोखले यांनी त्यांच्या निर्माते, दिग्दर्शकांना कल्पना दिली होती. दोन महिने आधी विक्रम गोखले यांनी आपण मनोरंजन क्षेत्र सोडणार असल्याचं त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सगळ्यांना १९८२ मध्ये सांगितलं होतं. या बाबत बोलताना विक्रम गोखलेच एका मुलाखतीत म्हणाले होते की, “मला या सृष्टीत राहायचं नाही हे सांगून, पूर्वसूचना देऊन मी गेलो होतो. मी सात वर्षे शेती करत होतो. ६ मे १९८२ ते २ मार्च १९८९ या कालावधीत मी काम करणं सोडून दिलं होतं. कारण प्रत्येक माणूस जो संसार चालवतो आहे, उपजिवीका चालवतो आहे. त्या व्यवसायात जर त्याच्या कर्तृत्वाला वाव नसेल, ठरलेले पैसे वेळेवर मिळत नसतील.. घामाचे पैसे मागण्यासाठी हात पसरावे लागत असतील तर मी या क्षेत्रात का राहायचं हा प्रश्न निर्माण झाला होता. अर्थशास्त्र, व्यवहार आणि कला यांची नीट सांगड घालता येत नसेल तर काय करणार? मी त्यामुळेच तो निर्णय घेतला. माझं काहीही अडत नाही. मी कामाला नाही म्हणून शकतो अशी क्षमता जेव्हा माझ्यात आली तेव्हा मी या सृष्टीत परतलो.” असं विक्रम गोखलेंनी सांगितलं होतं.
काशीनाथ घाणेकर सुपरस्टार नाहीत
काशीनाथ घाणेकर यांना आम्ही कुणीही (एका विशिष्ट विचारसरणीचे कलावंत) अभिनेता मानत नाही. सुपरस्टार तर सोडूनच द्या. काशीनाथ घाणेकरांवर प्रेम करणारे जे असंख्य लोक आहेत ज्यांनी काशीनाथ घाणेकरांना आणि काशीनाथ घाणेकर केलं हे सगळे माझ्यावर टीका करतील पण मला त्याची पर्वा नाही. मी जे माझ्या अभिनय शाळेत शिकलो ते माझ्यासाठी आदर्श आहे. मला विक्रम गोखले हा थर्ड क्लास अभिनेता आहे असंही कुणी म्हटलं तरीही हरकत नाही, पण मी काशीनाथ घाणेकरांना अभिनेता मानणार नाही. कारण अभिनयाच्या नावाखाली घाणेकर जे काही करत होते ते अभिनयाच्या व्याख्येत बसणारं नाही. यशस्वी होणं आणि अभिनय करता येणं हे दोन वेगळे भाग आहेत. शिक्षण आणि शहाणपण या दोन वेगळ्या गोष्टी असतात. तसंच एक यशस्वी अभिनेता आणि उत्तम अभिनेता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला काशीनाथ घाणेकर यांच्याविषयी काहीही मत्सर नाही. मात्र जे माझं मत आहे ते मी बदलणार नाही. असं विक्रम गोखले यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. आणि काशीनाथ घाणेकर या सिनेमात सुबोध भावेने खूप चांगलं काम केलं आहे. ते काम जर काशीनाथ घाणेकर यांनी काम केलं असतं तर वाईट केलं असतं असंही परखड मत विक्रम गोखले यांनी मांडलं होतं.