Zakir Hussain : सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांनी अमेरिकेतल्या सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने तबला पोरका झाला आहे. कारण जागतिक स्तरावर तबला पोहचवण्याचं काम झाकीर हुसैन यांनी केलं. वयाच्या सातव्या वर्षापासून तबला वादन या कलेची सुरु केलेली साधना रविवारी म्हणजेच १५ डिसेंबर २०२४ या दिवशी शांत झाली. झाकीर हुसैन म्हटलं की वाह उस्ताद वाह! या त्यांच्या ओळी आपसूकच आपल्यालाही आठवतात. मात्र हे ते त्यांच्या वडिलांना (अल्लाह राखा) उद्देशून म्हणाले होते. प्रत्यक्षात झाकीर हुसैन यांना ‘उस्ताद’ असं म्हटलेलं मुळीच आवडत नसे. त्यामागचं कारणही तसंच खास होतं.
मुंबईत लहानाचे मोठे झाले झाकीर हुसैन
मुंबईत मी लहानाचा मोठा झालो, मी प्रत्येक प्रकारचं संगीत ऐकलं. माझे वडील अल्लाह राखा खान हे जगभर फिरत असत आणि वेगवेगळ्या प्रकारचं संगीत मला ऐकवत असत. कमी वयातच मला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या, अनुभवता आल्या. त्यामुळे मी भारतच नाही तर जगातल्या लोकांसह काम करण्यास सक्षम झालो असं झाकीर हुसैन यांनी म्हटलं होतं. मला जगभरात काम करता आलं याचं श्रेय हे माझ्या वडिलांचं (अल्लाह राखा खान) यांचं आहे. वयाच्या १२ व्या वर्षी मी बडे गुलाम अली, आमीर खाँ, ओंकारनाथ ठाकूर यांची साथसंगत करायचो. वयाच्या १६ व्या-१७ व्या वर्षी मी पंडित रविशंकर, अली अकबर खान यांच्यासाठी तबला वादन केलं आहे. त्यामुळे मला लहान वयातच खूप मोठमोठ्या लोकांसह काम करण्याची संधी मिळाली असंही झाकीर हुसैन यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
वडिलांचा प्रभाव सर्वाधिक होता
झाकीर हुसैन यांनी याच मुलाखतीत हे सांगितलं होतं की माझ्यावर सर्वाधिक प्रभाव होता तो त्यांच्या वडिलांचा. म्हणजेच उस्ताद अल्ला राखा खान यांचा. तबला वादनाचं सुरुवातीचं प्रशिक्षण झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांना त्यांच्या वडिलांनीच दिलं. तबला कसा वाजवायचा? हात किंवा थाप कशी मारायची, वाद्यांशी समतोल कसा साधायचा? हे सगळं मला माझ्या वडिलांनी शिकवलं होतं. त्यानंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी तबला वादन करु लागलो. इतर तबला वादकांना ऐकलं तेव्हा त्यातूनही प्रेरणा मिळाली असंही झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांनी सांगितलं होतं.
हे पण वाचा- Zakir Hussain : झाकीर हुसैन यांना मिळालेलं पहिलंं मानधन किती होतं माहीत आहे का? वाचा रंजक किस्सा
दुसरं वाद्य वाजवण्याचा विचार कधीच आला नाही-हुसैन
झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांनी याच मुलाखतीत सांगितलं की त्यांना दुसरं वाद्य निवडण्याचा प्रश्नच कधी मनात आला नाही. ते म्हणाले होते, “लहानपणी अनेकवेळा रियाज केल्यानंतर मी झोपत असे तेव्हाही तबला माझ्याबरोबर असायचा. दुसरं वाद्य वाजवावं असा विचार मनात कधीच आला नाही. माझ्या वडिलांनी काही दिवस मला पियानो शिकण्यासाठी पाठवलं होतं. कदाचित पाश्चात्य संगीताबाबत मला थोडी माहिती व्हावी असा त्यांचा हेतू असावा. त्यामुळे मी पियानो आणि गिटारही वाजवलं. सतारही वाजवून पाहिली. कॅलिफोर्नियातील अली अकबर खान साहेब स्कूलमध्ये शिकत होतो. जेव्हा ते सरोदचा वर्ग घेत. त्यावेळी मीही पाठीमागे बसून काही टन-टन-टन वाजवायचो. पण माझा ओढा हा तबल्याकडेच सर्वाधिक राहिला. दुसऱ्या कोणत्या वाद्याकडे माझं लक्ष गेलं नाही.” याच मुलाखतीत आपल्याला उस्ताद म्हटलेलं आवडत नाही हे देखील झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) म्हणाले होते.
मै हमेशा शागीर्द रहना चाहता हूँ
या मुलाखतीत जेव्हा त्यांना तुम्ही स्वतःचं वर्णन कसं कराल हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) म्हणाले होते, “मला स्वतःला शागीर्द (शिष्य) म्हणून घ्यायलाच आवडेल. कारण मी रोज काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. माझे वडीलही मला म्हणायचे की बेटा उस्ताद होण्याचा प्रयत्न करु नकोस, चांगला शागीर्द हो. खूप काही शिकशील. मी रोज घरातून बाहेर पडतो तेव्हा मला माहीत असतं की मी आज काहीतरी नवीन शिकणार आहे.” असं झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांनी म्हटलं होतं. याच कारणामुळे त्यांना कधीही उस्ताद म्हटलं गेलं नाही.