भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्याची भुरळ आजही आपल्या मनांवर भुरळ करते आहे. लता मंगेशकर यांचा आज दुसरा स्मृती दिन. लता मंगेशकर यांचं २०२२ मध्ये आजच्याच दिवशी निधन झालं. आज लता मंगेशकर यांचा दुसरा स्मृती दिन आहे. लता मंगेशकर यांनी आजवर हजारो गाणी गायली आहेत. त्या आपल्यात नसल्या तरीही त्यांच्या आवाजाची जादू कायम आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण गाण्यांमधून त्या आपल्या बरोबर आहेतच हेच प्रत्येक रसिक प्रेक्षकाला वाटतं. आज लता मंगेशकर यांच्या स्मृती दिनानिमित्त राज ठाकरेंनी त्यांची एक आठवण सांगितली होती ती आम्ही तुम्हाला सांगत आहोत. राज ठाकरेंनी लता मंगेशकर यांच्याशी बोलणं बंद केलं होतं. काय घडलं होतं हे दस्तुरखुद्द राज ठाकरेंनीच सांगितलं होतं.
लता मंगेशकर आणि राज ठाकरे यांचे घनिष्ठ संंबंध
लता मंगेशकर आणि राज ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध होते. या दोघांमधलं नातं हे जिव्हाळ्याचं नातं होतं. राज ठाकरे हे कलासक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. लता मंगेशकर यांच्या नोटेशन्सही राज ठाकरे यांच्याकडे मखमली पेटीत त्यांनी जतन करुन ठेवल्या आहेत. राज ठाकरेंनी ती आठवण सांगितली होती. लता मंगेशकर यांनी माझ्यावर मुलासारखंच प्रेम केलं असंही राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरेंनी नोटेशन्सची आठवण सांगितली तेव्हा काय घडलं होतं ते देखील राज ठाकरेंनी सांगितलं होतं.
लतादीदींनी फोन केला आणि मला कळलंच नाही-राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले होते, “लतादीदी कधीही फोनवर हॅलो म्हणायच्या नाहीत. मला त्यांनी एकदा फोन केला. त्यापूर्वी आमचं फोनवर कधीही बोलणं झालं नव्हतं. त्यांचा फोन आला त्यांनी फक्त हॅलो म्हटलं आणि विचारलं राज ठाकरे आहेत का? मी म्हटलं हो बोलतोय. राज नमस्कार मी लता. कोण लता? त्या म्हणाल्या लता मंगेशकर. त्यानंतर मी लगेच जाऊन त्यांची भेट घेतली.”
हे पण वाचा- AI ची कमाल! लतादीदींच्या आवाजातील ‘राम आएंगे’ गाणं ऐकलंत का? झालं तुफान व्हायरल
लता मंगेशकर यांच्या नोटेशन्सचा अमूल्य ठेवा
लता मंगेशकर यांच्यावरच्या पुस्तकाचं काम मी करतो आहे. मी जेव्हा दीदींचा पहिला कार्यक्रम केला होता त्यावेळी दीदी आणि शेजारी बसलो होतो. त्यावेळी त्या बॅगेतून कागद काढायच्या बघायच्या आणि ऑर्केस्ट्राला हमिंग करायच्या. इतक्या वाद्यांतून तो आवाज बरोबर ऐकू जायचा. इतका शार्प आवाज मी कधीही ऐकला नव्हता. त्यानंतर दोन-तीन कार्यक्रम झाले. मी त्यांना विचारलं ते कागदावर तुम्ही जे पाहता ते काय असतं? त्यावर लतादीदी म्हणाल्या पूर्वीच्या काळी जे कवी, गीतकार असायचे ते उर्दूत लिहायचे. काही कवी होते त्यांचं अक्षर कळायचं नाही. संगीतकार गाणं सांगायचे तेव्हा अक्षर समजायचं नाही, उर्दूत लिहिलेलं असायचं त्यामुळे मी ती गाणी हस्ताक्षरात उतरवून घेतली आहे. मी श्वास कुठे घ्यायचा आहे, कशावर जोर द्यायचा आहे त्याची नोटेशन्स त्या कागदांवर आहेत. मी त्यांना म्हटलं हे सगळं अमूल्य आहे. मला पुस्तक करायचं आहे. त्यांनी बॅगच्या बॅग मला दिली मला म्हणाल्या राज जा कर याचं पुस्तक. त्यामुळे मी त्या पुस्तकावर काम करतोय. मी त्याचं मुखपृष्ठ त्यांना दाखवू शकलो, पुस्तक दाखवता आलं नाही. पण कव्हरपेज पाहून त्यांना ते आवडलं आणि त्यांनी मला शाबासकी दिली होती. लवकरच ते प्रकाशित होईल.” असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं.
राज ठाकरेंनी लता मंगेशकरांशी बोलणं का सोडलं होतं?
लता मंगेशकर आणि राज ठाकरे यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचं मायेचं नातं होतं. मात्र राज ठाकरेंनी एकदा लता मंगेशकरांशी बोलणंच सोडलं होतं. याबाबतही राज ठाकरेंनी एका मुलाखतीत काय घडलं ते सांगितलं होतं. राज ठाकरे म्हणाले, “दीदी आणि माझ्यात एकदाच गैरसमज झाला होता. तो कुणामुळे झाला? का झाला ते जाऊद्या. पण मी त्यांच्याशी बोलणं बंद केलं. फोन वगैरेही त्यांना केला नाही. एक दिवस पुण्यात लतादीदींचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला त्या संस्थेने मला बोलवलं होतं. स्टेजपासून मी बराच लांब एका कोपऱ्यात होतो. प्रसाद पुरंदरे वगैरे सगळे माझ्याबरोबर होते. तोपर्यंत तीन ते साडेतीन महिने मी लतादीदींशी काहीही बोललो नव्हतो. बोलणंच सोडून दिलं होतं. मी आणि प्रसाद पुरंदरे बोलत असताना एक माणूस तिथे आला आणि म्हणाला तुम्हाला दीदींनी बोलवलं आहे स्टेजवर. मी बरं म्हटलं. थोड्यावेळाने परत तो माणूस निरोप घेऊन आला. त्यानंतर मी स्टेजवर गेलो. त्यावेळी विंगेतल्या खुर्चीवर बसलो. दीदी गाणं म्हणून विंगेत आल्या माझ्याकडे पाहिलं. मी त्यांना वाकून नमस्कार केला. नंतर खुर्चीत बसल्या मलाही बसायला सांगितलं. मी तेव्हा फक्त रडलो नव्हतो. मला बसवल्यावर म्हणाल्या काय राज चिडलात माझ्यावर? मी त्यांना म्हटलं दीदी तुमच्यावर चिडण्याचीही आमची औकाद नाही. पण मला वाईट वाटलं म्हणून मी दूर झालो. मला म्हणाल्या मी दिलगिरी व्यक्त करु का? मी त्यांना म्हटलं होतं काय बोलता आहात.. मला म्हणाल्या आहात ना, थांबा नंतर जेवायला जाऊ. आमच्यात एका व्यक्तीने आमच्यात वाद घडवून आणला होता. पण नंतर सगळं सुरळीत झालं.” अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली होती.