आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. आपल्या आवाजाने सर्वांची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला. रविवारी (६ फेब्रुवारी) सकाळी १० च्या सुमारास लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथील मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लतादीदी यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी लहानपणापासूनच खूप संघर्ष केला. लतादीदी या अनेकदा पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायच्या. एकदा एका मुलाखतीत त्यांना याबाबत प्रश्नही विचारला गेला होता. लतादीदी तुम्ही नेहमी पांढऱ्या रंगाची साडी का परिधान करता? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, मला लहानपणापासून पांढरा रंग फार आवडतो. मी लहान असतना घागरा चोळी घालायची ती ही पांढऱ्या रंगाची असायची. पण काही वर्षांपूर्वी एकदा मी रंगीत साड्या नेसायला सुरुवात केली होती. त्यावेळी मी प्रत्येक रंगाच्या साड्या नेसायची.
पण एक-दोन वर्षांनी अचानक असे वाटले की याला काही अंत नाही. मला आज गुलाबी, उद्या पिवळा आणि परवा निळा हे रंग आवडतील. म्हणून मी आजपासून पांढऱ्या रंगाशिवाय काहीही घालणार नाही असा निर्णय घेतला, असेही लतादीदी म्हणाल्या होत्या. लतादीदींचा साधेपणा आणि पांढर्या रंगाशी असलेली त्यांची ओढ याबाबत अनेकदा बोललं जाते. विशेष म्हणजे त्या अनेकदा केसातही पांढऱ्या रंगाची फुले माळायच्या.
आशा भोसलेंनी शेअर केला लतादीदींसोबत बालपणीचा ‘तो’ फोटो, म्हणाल्या…
लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.