हिंदी चित्रपटसृष्टीत कथा-पटकथा लेखनाच्या बळावर २२ सुपरहिट चित्रपट देत न भूतो न भविष्यती असा इतिहास घडवणारे सलीम-जावेद एका टप्प्यावर वेगळे झाले. त्यांचे मार्ग वेगळे झाल्यानंतर वैयक्तिकरीत्या त्यांच्या आयुष्यात परिणाम झाला का? तर हो झाला… पण सगळ्यात मोठा परिणाम झाला होता तो तत्कालीन हिंदी चित्रपटसृष्टीवर. शंभर टक्के यशस्वी ठरणार या विश्वासाने कथा लिहून देणाऱ्या या जोडीने स्वत:बरोबरच निर्माते, दिग्दर्शक, कलाकार सगळ्यांनाच सुगीचे दिवस दाखवले होते. त्यामुळे या दोघांची इतकी भन्नाट जोडी का तुटली? हा प्रश्न त्यांच्या जिवलगांबरोबर त्यांच्या चाहत्यांना आजही तितकाच छळतो आहे याची प्रचीती ‘अँग्री यंग मेन’ नावाची वेबमालिका पाहताना येते.
हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अत्यंत प्रतिभावंत पटकथा-संवाद लेखक जोडी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या मैत्रीची, त्यांच्या वैयक्तिक संघर्षाची, एकत्रित उभ्या केेलेल्या गोष्टींच्या साम्राज्याची, त्यांच्या यशाची-अपयशाची, अहंकाराची-दु:खाची सगळ्याची गोळाबेरीज मांडण्याचा प्रयत्न नम्रता राव दिग्दर्शित ‘अँग्री यंग मेन’ या चरित्रात्मक वेबमालिकेतून करण्यात आला आहे. प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या या तीन भागांच्या वेबमालिकेची निर्मिती या दोघांच्या मुलांनी म्हणजेच सलमान खान, झोया अख्तर आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. सलीम-जावेद नावाच्या झंझावाताची कथा सांगणारी ही वेबमालिका फार महत्त्वाची ठरते.
या वेबमालिकेची मांडणी करताना दिग्दर्शक नम्रता राव यांनी काहीशा सुटसुटीत आणि त्यांचे चित्रपट-संवाद यांच्या शैलीशी मेळ साधणाऱ्या रंजक, तितक्याच सूचक पद्धतींचा वापर केला आहे. तीन भागांपैकी या दोघांचीही वैयक्तिक ओळख करून देणाऱ्या प्रथम भागाला ‘मैं फेके हुए पैसे नही उठाता’ या त्यांच्या पहिल्या ‘जंजीर’ या सुपरहिट चित्रपटातील संवादाचा शीर्षक म्हणून वापर करण्यात आला आहे. सलीम खान आणि जावेद अख्तर ही दोन वेगवेगळ्या परिस्थितीत जन्माला आलेली, वेगळ्या वातावरणात लहानाची मोठी झालेली आणि तितक्याच वेगळ्या कारणांमुळे मुंबईत नशीब आजमावायला आलेली दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वं होती. दोघांचाही संघर्ष वेगळा होता आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या संघर्षामुळे त्यांची झालेली जडणघडणही भिन्न होती. दोन भिन्न वृत्तीची, प्रकृतीची माणसं एका अवचित वळणावर सर्जनशील कलाप्रकाराच्या निमित्ताने एकत्र आली. दोघंही ठरवून लेखक झाले नव्हते. सलीम खान यांची सुरुवात अभिनय क्षेत्रात झाली होती. तिथे त्यांचा थोडाथोडका नव्हे तर दशकभराहून अधिक काळाचा संघर्ष होता. जावेद हे त्यांच्याहून वयाने लहान. उर्दूची आवड, कैफी आझमींचा सहवास, काहीतरी करून दाखवायचं हे स्वप्न उराशी घेऊन कमाल अमरोहींच्या स्टुडिओपर्यंत आलेली त्यांची वाट तिथेच रेंगाळली. संवाद लेखनात, पटकथा लेखनात साहाय्यक म्हणून त्यांनी सुरुवात केली. या दोघांच्या व्यक्तिमत्त्वातला एक धागा समान होता तो म्हणजे दोघंही स्वाभिमानी होते. वेबमालिकेच्या या पहिल्याच भागात सलीम – जावेद या दोघांचंही व्यक्तिमत्त्व आणि त्यांनी उभ्या केलेल्या विजय या अँग्री यंग मॅन कथानायकाचा उदय हे सारे धागे नम्रता राव यांनी सुरेख पद्धतीने गुंफले आहेत.
दुसऱ्या भागासाठी ‘मेरे पास माँ है’ हा त्यांच्या ‘दीवार’ या प्रसिद्ध चित्रपटातील संवादाचा शीर्षक म्हणून वापर करत एकीकडे ‘जंजीर’पासून सुरू झालेली सलीम-जावेद या जोडीची वाटचाल मांडताना ‘शोले’, ‘दीवार’ या त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांविषयीचं वर्णन, त्यांच्या कारकीर्दीचा ऊहापोह या भागात करण्यात आला आहे. इथे कधी सलीम खान कधी जावेद साब यांच्याकडून किस्से ऐकता ऐकता हा प्रवास पुढे सरकतो. तर ‘शोले’चे दिग्दर्शक रमेश सिप्पी, ‘दीवार’चे दिग्दर्शक यश चोप्रा, दिग्दर्शक रमेश तलवार या त्यांच्या सहकाऱ्यांच्या कथनातून त्यांचा लेखक आणि दिग्दर्शक यांच्या एकत्रित प्रयत्नातून या यशस्वी कलाकृती कशा उभ्या राहिल्या, त्यांचं वेगळेपण, त्यांचा टोकाचा आत्मविश्वास, यशाची चढती कमान या गोष्टी उलगडत जातात. मात्र त्याचवेळी अभिषेक-श्वेता बच्चन, करण जोहर, फरहान-सलमान या पुढच्या पिढीने वैयक्तिकरीत्या अनुभवलेलं त्यांचं व्यक्तित्व आणि त्यांच्या चित्रपटातील नायक-नायिका यांचं केलेलं विश्लेषण किंवा त्यांच्या नजरेतून दिसलेल्या गोष्टींचीही चर्चा इथे होते. आणि मग त्यांचे चित्रपट नायकप्रधान होते, तरी त्यातल्या नायिका विशेषत: नायकाची आई खंबीर भूमिका घेणारी दिसते. यामागे दोघांचंही त्यांच्या आईशी असलेलं नातं, त्याचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम आणि पुढे जोडीदार म्हणून त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांचाही प्रभाव कसा पडला हे सगळं संवादातूनच उलगडत जातं. मात्र हा कुठलाच प्रकार रटाळ झालेला नाही.
‘कितने आदमी थे’
तिसऱ्या भागात त्यांचा वाढत गेलेला फाजील आत्मविश्वास, परिणामी यशाकडून अपयशापर्यंत झालेला उलटा प्रवास, यशाची हवा डोक्यात जाणं आणि त्यामुळे वैयक्तिक आयुष्यातही उलटसुलट घेतलेले निर्णय आणि अपरिहार्यपणे झालेला या जोडीचा एकमेकांपासून फारकत घेण्यापर्यंतचा प्रवास उमजत जातो. वेगळं होण्याचा निर्णय कोणी घेतला? कारण काय? हे आपापल्या परीने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी त्या तपशिलात ते फारसे गेलेले नाहीत. मात्र ते एकत्र होते तेव्हाही त्यांच्यासारखं कोणी नव्हतं आणि त्यांच्यानंतरही तसं कोणीच झालं नाही, हे ठणकावून सांगण्याचा प्रयत्न ‘कितने आदमी थे’ या अखेरच्या भागातून झाला आहे.