आपल्या गाण्याबरोबरच अंडरवर्ल्डकडून मिळणा-या धमक्यांमुळे प्रकाशझोतात आलेला सोनू निगम ‘बेशरम’च्या निर्मात्यांवर चांगलाच भडकला आहे. ‘बेशरम’ आणि ‘डेव्हिड’ सारख्या तद्दन पडेल चित्रपटांसाठी प्रसिद्धीचा खटाटोप करणारी ‘रिलायन्स एन्टरटेन्मेट’ ही चित्रपट निर्माती कंपनी त्यांच्या ‘सुपर से उपर’ या चित्रपटाला सावत्र वागणूक देत असल्याचा त्याचा आरोप आहे. बॉक्स ऑफिसवर पडलेल्या ‘बेशरम’ चित्रपटासाठी रिलायन्सने केलेले प्रसिद्धी कार्यक्रम पाहता सोनूच्या त्रागा करण्यास काही आधार आहे, असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. सोनूने ‘सुपर से उपर’ चित्रपटासाठी केवळ गाणी गायली नसून, चित्रपटाला संगीतसुद्धा दिले आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायला केवळ दहा दिवस शिल्लक असून, चित्रपटाचे एकही गाणे अजून प्रसारित करण्यात आलेले नाही, ना संगितासाठी प्रसिद्धी कार्यक्रम राबविण्यात आला आहे. याशिवाय अद्याप निर्मात्यांकडून म्युझिक कंपनीला अल्बम प्रसिद्ध करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी काहीही न केल्याचे पाहून मला आश्चर्य वाटत आहे. जे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले, अशा चित्रपटांसाठी प्रसिद्धीचे कार्यक्रम राबवणा-या निर्मिती कंपनीने, ज्या चित्रपटाकडून ब-याच आशा व्यक्त केल्या जाऊ शकतात अशा चित्रपटाच्या प्रसिद्धीकडे पाठ फिरवली आहे. आम्ही या चित्रपटासाठी आमचे तन, मन आणि स्वत:चा पैसा देखील लावला असून, ‘बेशरम’ आणि ‘डेव्हिड’सारख्या चित्रपटांना उचलून धरणा-या ‘रिलायन्स एन्टरटेन्मेन्ट’ने आमच्या चित्रपटाची एकप्रकारे हत्याच केली असल्याचे म्हणत सोनूने ट्विटरवर आपल्या मनातली भडास व्यक्त केली आहे.
‘सुपर से उपर’ चित्रपटाचे संगीत उत्तम झाले असून, त्याचा मालकी हक्क असलेल्यांना याची किंमत कळलेली नाही. २५ तारखेला चित्रपटगृहात दाखल होणा-या या चित्रपटाची गाणी अद्याप प्रसिध्द करण्यात आलेली नाहीत. संगीताचा प्रचार करण्याबाबत रिलायन्सकडून संमती पत्रक न मिळाल्याचे टी-सिरिजने म्हटले आहे. अस कधी होत का? ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट असल्याचे सोनूने म्हटले आहे.
कोणीतरी सेलिब्रिटी या विरुध्द उभे राहून आपल्या भावना व्यक्त करत आहे ही नक्कीच चांगली बाब आहे. यात काही बदल होईल? या विषयी आम्ही साशंक आहोत.
‘बेशरम’ चित्रपटासाठी सोनूने गायलेल्या ‘तू ही’ या गाण्याची सुध्दा प्रसिध्दी करण्यात आली नव्हती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा