भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
लतादीदी गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मने जिंकली. २८ सप्टेंबर १९२९ मध्ये इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडीलांकडून पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या होत्या. १९४२ मध्ये लता मंगेशकर १३ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. लतादीदींनी लग्न का केले नाही? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र काही वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांनी स्वत: यामागचे कारण सांगितले होते.
Lata Mangeshkar Passes Away : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन
वडिलांच्या निधनानंतर लता मंगेशकर यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी आली. त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. घराच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी लग्न केले नाही. त्यांनी स्वतःच त्यांच्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. मी अनेक वेळा लग्नाचा विचार केला होता. पण त्याची अंमलबजावणी करू शकले नाही, असे लता मंगेशकर यांनी म्हटले होते.
एका मुलाखतीत त्यांना त्यांच्या लग्नाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्या म्हणाल्या की, मी १३ वर्षांची असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांच्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. त्या भावंडांमध्ये सर्वात मोठ्या होत्या. त्यामुळे तरुण वयातच पोटापाण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या. मी अनेकदा लग्नाची कल्पना केली होती. पण प्रत्यक्ष तसे करता आले नाही. भावंडांची, कुटुंबाची आणि घरची संपूर्ण जबाबदारी पाहता माझा वेळ त्यात निघून गेला. त्यामुळे माझे लग्न झाले नाही.
दरम्यान भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. लतादीदींच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून सर्वच स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.