दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून महेश बाबूला ओळखले जाते. महेश बाबूने अभिनयासोबत आपल्या डॅशिंग पर्सनॅलिटीने चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत झालेला हा अभिनेता नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. नुकतंच महेश बाबूने हिंदी सिनेसृष्टीला मी परवडणार नाही. त्यामुळे हिंदी चित्रपट करुन मला माझा वेळ फुकट घालवायचा नाही, असे वक्तव्य केले होते. यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आहे.
महेश बाबू हा नेहमी त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. नुकतंच त्याने मला बॉलिवूडमधून फार जास्त ऑफर मिळालेल्या नाहीत. पण मला वाटत नाही की त्यांना मी परवडेन आणि मला अशा सिनेसृष्टीत काम करायचे नाही ज्यांना मी परवडत नाही, असे वक्तव्य केले होते. पण बॉलिवूडमध्ये येण्यासाठी त्याला नेमकी कशाची भीती वाटत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकतंच यामागची कारण समोर आली आहेत.
फ्लॉप होण्याची भीती
जेव्हा एखाद्या अभिनेत्याचे सिनेसृष्टीत मोठे नाव असते किंवा तो दुसऱ्या भाषेच्या सिनेसृष्टीशी निगडीत असतो, तेव्हा त्याला बॉलिवूडमध्ये किंवा इतर सिनेसृष्टीत लगेचच यश मिळेल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. ही खूप मोठी जोखीम असून फार कमी लोक ती घेण्याचा विचार करतात. महेश बाबू हा त्यातीलच एक आहे.
बॉलिवूडमधील अनेक दाक्षिणात्य कलाकार फ्लॉप ठरले आहेत. त्यांचे अनेक हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आदळल्यानंतर त्यांनी ही चूक पुन्हा केली नाही. ते सध्या त्यांच्या सिनेसृष्टीत स्थिरावले आहेत. त्यामुळेच महेश बाबूलाही हिच भीती वाटत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाला तर त्याच्यासाठी हा मोठा धक्का असेल.
स्टारडमवर परिणाम
महेश बाबूने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पण त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललाच नाही तर त्याच्या स्टारडमवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. महेश बाबूचे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मोठा चाहता वर्ग आहे. त्याला धक्का लागू नये, यामुळेच त्याने हा निर्णय घेतल्याचे बोललं जात आहे.
चांगली भूमिका न मिळणे
बॉलिवूड हे भव्य दिव्य म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळतात. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एखादी चांगली भूमिका मिळणे फार कठीण असते. महेश बाबूला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स आल्या पण त्यांनी त्या स्विकारलेल्या नाहीत. कदाचित त्याला त्याची आवडीची भूमिका मिळालेली नाही. हिंदी सिनेसृष्टीत महेश बाबूचा चाहता वर्ग फार जास्त आहे. त्यामुळेच कदाचित चित्रपटाचे निर्माते हे स्टारडमचा विचार करुन चांगल्या चित्रपटाची निर्मिती करतील की नाही, याबाबत त्याला शंका आहे. त्यामुळे कोणीही कलाकार हा धोका पत्करु शकत नाही.
अभिनय करण्यात कमी
महेश बाबू दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाते. त्याने आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण तो इतर दाक्षिणात्य कलाकारांप्रमाणे तो अँग्री यंग मॅन, अॅक्शन चित्रपटात फार कमी वेळा झळकला आहे. त्यामुळे तो अभिनय करण्यात कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सरिलेरू नीकेव्वरू (Sarileru Neekevvaru) या चित्रपटात महेश बाबू झळकला होता. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता तो सरकार वारी पेटला (Sarkaru Vaari Petla) या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १२ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.