सुकेश चंद्रशेखर मनी लाँडरींग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची चौकशी सुरू आहे. सध्या जामिनावर बाहेर असलेल्या जॅकलिनच्या नियमित जामिनावर उद्या कोर्ट निर्णय देऊ शकते. पटियाला कोर्टाने निर्णय उद्यासाठी राखून ठेवला आहे. आजच्या सुनावणीत जॅकलिन फर्नांडिस आणि पिंकी इराणी कोर्टात हजर झाल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरू होईल, असं पटियाला हाऊस कोर्टाने म्हटलं. ईडीने सांगितले की, ‘आम्ही या प्रकरणातील सर्व कागदपत्रे आरोपी लीना (सुकेशची पत्नी) यांच्याकडे सोपवली आहेत.’ न्यायालयाने ईडीच्या वकिलाला या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे सर्व आरोपींना देण्यास सांगितले. यावर ईडीने म्हटलं की, ‘सर्व कागदपत्रे ई-मेलद्वारे पाठवली जातील. त्यावर न्यायालयाने सांगितले की, उशीर न लावता सर्वांना कागदपत्रे पाठवा. कोर्टाने ईडीच्या वकिलांना खटल्याशी संबंधित सर्व कागदपत्रांच्या कॉपी देण्यास सांगितलं. तसेच सप्लिमेंट्री आरोपपत्राची प्रतही द्यावी,’ असंही सांगितलं.

‘खटल्याशी संबंधित सर्व कागदपत्रे दिल्यानंतर आरोप निश्चित करण्याबाबत सुनावणी केली जाईल,’ असे न्यायालयाने सांगितले. पटियाला हाऊस कोर्टातील सर्व आरोपींवर आरोप निश्चित करण्याबाबत २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी युक्तीवाद केले जातील. जॅकलिनच्या नियमित जामिनावरील सुनावणीदरम्यान तिच्यावतीने वकिलाने सांगितले की, “मी या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करत आहे, मात्र मी देश सोडणार असल्याचा आरोप ईडीने केला आहे. मला एलओसी देऊन थांबवण्यात आलं. हे सर्व आरोप निराधार आहेत.”

“मी काहीही केलेलं नाही,” असं जॅकलिनच्या वतीने वकिलाने न्यायालयाला सांगितले. मी तपासात सहकार्य करत आहे. “या प्रकरणी मी स्वतः सरेंडर केलंय. न्यायालयाने मला अंतरिम जामीन मंजूर केला, पण ईडी या प्रकरणी मला त्रास देत आहे.” यावर ही तपास यंत्रणा तपासाची प्रक्रिया असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तपास यंत्रणेला या प्रकरणात काही आढळले तर ती आरोपींची चौकशी करू शकते. जॅकलिनच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत म्हटले की, जर कोणी आरोपी तपासात सहकार्य करत असेल तर त्याच्याबद्दल सहानुभूती असली पाहिजे.

“मी तपासापासून पळत नाहीये, तर मग ईडी मी देश सोडून जात असल्याचं कसं म्हणू शकते? या प्रकरणात मला नियमित जामीन मिळायला हवा,” तिच्या वतीने असे जॅकलिनच्या वकिलांनी सांगितले. मात्र, जॅकलिनच्या जामिनाला ईडीने विरोध केला आहे. ईडीने सांगितले की, “तपासात सहकार्य करणे म्हणजे आरोपी देशाबाहेर जाऊ शकतो किंवा पुराव्यांशी छेडछाड करू शकत नाही, असा होत नाही. तपास यंत्रणेने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत गंभीरपणे तपास केला आहे. जॅकलीनने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर उडवा-उडवीचे दिले आहे.”

“जर तुमच्याकडे जॅकलिनविरोधात पुरेसे पुरावे आहेत तर तुम्ही तिला अटक का केली नाही? जर तुम्ही एलओसी जारी केली होती तर तुम्ही तिला अटक का केली नाही? तर या प्रकरणातील अन्य आरोपी तुरुंगात आहेत. तुम्ही पिक अँड चूजचे धोरण का स्वीकारत आहात? या प्रकरणात तपासाची व्याप्ती किती मोठी आहे? १०० कोटी कुठे? तपास कुठपर्यंत पोहोचला?” असे प्रश्न कोर्टाने ईडीला विचारले.

ईडीच्या वकिलाने सांगितले की, “जॅकलिनसमोर पुरावे सादर केल्यानंतर तिने वस्तुस्थिती सांगितली. आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्यात ५० लाख रुपये एकत्र पाहिले नाहीत, मात्र जॅकलिनने केवळ मौजमजेसाठी ७.१४ कोटी रुपये खर्च करून टाकले. तसेच जॅकलिनने देश सोडण्याचे सर्व प्रयत्न करून पाहिले, कारण तिच्याकडे पैशांची कमतरता नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे तिला जामीन दिला जाऊ नये.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why not arrest jacqueline fernandez court asks to end in sukesh chandrasekhar money laundering case hrc