कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. दरवर्षी सर्वच पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांची नाव गुप्त ठेवली जातात. यामागे एक विशेष कारण आहे.
आपण आजवर मनोरंजन क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, काही साहित्य, तर काही विज्ञान क्षेत्रातील पुरस्कार सोहळे पाहिले आहेत. या सर्व पुरस्कार सोहळ्यांमध्ये एकच गोष्ट ठराविक असते ती म्हणजे एखादी व्यक्ती व्यासपीठावर येऊन सीलबंद पाकीट फोडते आणि पुरस्कारच्या मानकऱ्याची घोषणा करते. पण याची सुरुवात ऑस्कर पुरस्कारानेच झाली आहे.
आणखी वाचा : ऑस्कर पुरस्कार म्हणून मिळणारी ट्रॉफी खरंच सोन्याची असते का? जाणून घ्या किंमत
विविध पुरस्कार सोहळ्यांमधील विजेत्यांचं नाव सिलबंद पाकिटात गुप्त ठेवण्याची सुरुवात ऑस्कर पुरस्कारानेच झाली आहे. १९२९ साली पहिला ऑस्कर सोहळा साजरा केला गेला. त्यावेळी सर्व विजेत्यांची नावं तीन महिने आधीच जाहीर करण्यात आली होती. विजेत्यांची नावं आधीच माहिती असल्याने पहिल्या ऑस्करबाबत कुणीच फारसे उत्साही नव्हते. यावर त्यावेळीचे प्रसिद्ध दिग्दर्शक सेड्रिक गिब्ज यांनी एक उपाय सुचवला. एखाद्या विजेत्याचे नाव थेट जाहीर करण्यापेक्षा त्या क्षेत्रातील पाच संभाव्य विजेत्यांची नावं जाहीर करायची. या प्रकाराला आपण आज नामांकन असे ओळखतो.
या पाचही नामांकित स्पर्धकांची जाहिरात करायची आणि पुरस्काराच्या दिवशी यातील एका विजेत्याचं नाव जाहीर करायचं, अशी कल्पना त्यांनी मांडली. त्यांनी मांडलेली ही कल्पना ऑस्कर समितीतील सर्व सभासदांना आवडली.त्यावेळी वृत्तमाध्यमांना आदल्या दिवशी रात्री ११ वाजता विजेत्यांच्या नावांची यादी दिली जायची. यामुळे पुरस्कार सोहळ्याच्या दिवशी त्यांची जाहिरातही होत असे आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांमध्ये पुरस्काराबाबत उत्साह देखील कायमच असायचा.
पण १९४१ साली यात थोडासा बदल करण्यात आला. ऑस्कर समितीने आदल्या दिवशी वृत्तमाध्यमांना विजेत्यांची नावं देणं थांबवलं. त्यांनी सिलबंद पाकिटात नावं गुप्त ठेवण्याचा प्रयोग सुरु केला आणि हे पाकिट व्यासपीठावरच फोडले जाईल याची काळजी घेतली. हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांना प्रचंड आवडला. यामुळे प्रेक्षक, कलाकार आणि वृत्तमाध्यमामध्येही उत्सुकता पाहायला मिळाली. तसेच ऑस्करबाबत प्रेक्षकांमध्ये अधिक उत्साह निर्माण झाला. त्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत ऑस्कर विजेत्यांची नावं सिलबंद पाकिटात शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवली जातात.