सध्या सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंड चांगलाच चर्चेत आहे. प्रेक्षक सध्या चित्रपटसृष्टीवर या खासकरून बॉलिवूडवर नाराज आहेत असं चित्रं सध्या सोशल मीडियावर दिसत आहे. प्रेक्षक सध्या बॉलिवूडप्रती त्यांची असलेली चीड बॉयकॉटच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. बड्याबड्या स्टार्सच्या चित्रपटांना बॉयकॉट केल्यानंतर लोकं आता ते स्टार ज्याची जाहिरात करतात अशा मोठमोठ्या ब्रॅंडना बॉयकॉट करत आहेत. जसं मध्यंतरी आमिर खानच्या असंहिष्णुतेच्या वक्तव्यानंतर लोकांनी snapdeal या ऑनलाईन वेबसाईटवर बहिष्कार घातला होता. आता लोकांनी हृतिक रोशनच्या एका जाहिरातीमुळे चक्क झोमॅटोला बॉयकॉट करा असा ट्रेंड सोशल मीडियावर रविवारपासून चालवला आहे. हृतिकच्या या जाहिरातीमुळे उज्जैनच्या महाकाल मंदिरातले दोन पुजारी चांगलेच दुखावले आहेत. त्यांनी झोमॅटो कंपनीकडे ही जाहिरात मागे घ्यावी अशी विनंती केली आहे.

‘मन कीया झोमॅटो कीया’ या टॅगलाईन अंतर्गत बनलेल्या या जाहिरातीत हृतिक म्हणतो “उज्जैनमध्ये असताना त्याला थाळी जेवायची इच्छा झाली तर त्याने थेट ‘महाकाल’कडून ऑर्डर केली.” उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे. इथे कायम लाखो भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हृतिकच्या या जाहिरातीमुळे याच मंदिरातल्या दोन पूजऱ्यांनी म्हणजेच महेश आणि आशीष यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

ते म्हणतात की “झोमॅटोने ही जाहिरात लवकरात लवकर थांबवली पाहिजे आणि सगळ्या भक्तांची माफी मागितली पाहिजे. भक्तांना मंदिरातला प्रसाद हा थाळी स्वरूपात दिला जातो. ती गोष्ट ऑनलाईन ऑर्डर करण्यासारखी नाही. यामुळे कित्येक हिंदू भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.” तिथल्या इतरही पूजाऱ्यांनी आता याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. “भूक लागेल तेव्हा ऑर्डर करा, ५ मिनिटांत महाकाल थाळी मिळेल” असं म्हणत झोमॅटोने आमच्या श्रद्धेची खिल्ली उडवली आहे. असं तिथल्या इतर पूजऱ्यांचं म्हणणं आहे. पण याविरोधात तक्रार दाखल करून शांतीपूर्वक मार्गाने याचा विरोध करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखीन वाचा : “आपला धर्म…” ‘बॉयकॉट लाइगर’च्या ट्रेंडवर विजय देवरकोंडाचे स्पष्ट विधान

या सगळ्या गदारोळानंतर लगेचच ट्विटरवर ‘बॉयकॉट झोमॅटो’ हा ट्रेंड व्हायरल होऊ लागला आहे. लोकं याविरोधात झोमॅटो आणि हृतिकवर सडकून टीका करत आहेत. मध्यंतरी आमिरच्या चित्रपटाचं कौतुक केल्याने आधीच हृतिकविरोधात ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ ट्रेंड व्हायरल होत होता. हृतिक आणि सैफ अली खान यांचा आगामी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट याचवर्षी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. मुळ चित्रपटात माधवन आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत होते.

Story img Loader