‘बॉयकॉट ट्रेंड’ने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. आमिर आणि अक्षयसारख्या मोठ्या स्टार्सचे चित्रपट याच बॉयकॉट ट्रेंडमुळे आपटले. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’च्या विरोधातही बॉयकॉट ट्रेंड चांगलाच जोरात होता तरी चित्रपटाने चांगली कमाई केली. आता पुन्हा बॉयकॉट ट्रेंड चर्चेत आहे पण यावेळी तो कोणत्या चित्रपटासाठी नव्हे तर एका टेलिव्हिजनवरील रीयालिटि शोसाठी.
भारतीय टेलिव्हिजन चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणारे बरेचसे रीयालिटि शो ही खरे नसतात. ते ठरवून रचलेलं एक नाट्य असतं असे आरोप बऱ्याचदा लागलेले आहेत. आता अशाच एका रीयालिटि शोला बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर होताना दिसत आहे. तो प्रसिद्ध कार्यक्रम म्हणजे ‘इंडियन आयडल’. ज्या कार्यक्रमातून भारताला त्यांचा पहिला इंडियन आयडल मिळाला अशा या लोकप्रिय कार्यक्रमावर सध्या प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत.
‘इंडियन आयडल सीझन १३’च्या फायनल १५ स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. यामध्ये सोनाक्षी कर, नवदीप वडाली, प्रीतम रॉय, देबोस्मिता रॉय ही नावं प्रामुख्याने असली तरी अरुणाचल प्रदेशच्या रितो रिबा या स्पर्धकाचं नाव यात नसल्याने कार्यक्रमाच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. यामुळेच या कार्यक्रमाला बॉयकॉट करण्याची मागणी होताना दिसत आहे.
ऑडिशन पूर्ण झाल्यावर परीक्षक नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया यांनी मिळून या स्पर्धकांची नावं काढली आहेत. यामध्ये रितो रिबाचं नाव नसल्याने सोशल मीडियावर फॅन्सनी या कार्यक्रमाला बॉयकॉट करत निषेध व्यक्त केला आहे. अरुणाचल प्रदेशमधून आलेला रितो एक उत्तम गायक आणि संगीत दिग्दर्शकही आहे, ऑडिशनदरम्यान हिमेश यांनी स्वतःचं एखादं गाणं सादर करण्याची मागणी केल्यावर रितोने त्याचं स्वतःचं गाणं सादर केलं. लोकांना ते चांगलंच पसंत पडलं. अशा हरहुन्नरी गायकाला कार्यक्रमात स्थान न दिल्याने फॅन्स चांगलेच नाराज आहेत. नेहा कक्करही फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर बनवलेल्या रिमिक्समुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे त्यामुळेही या कार्यक्रमावर सगळ्याच स्तरातून टीका होताना दिसत आहे.