बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि कतरिना कैफच्या ‘भारत’ चित्रपटचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला. सलमानच्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता होती.तसेच चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर चित्रपटाची कहाणी काय असणार याची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात सलमान आणि कतरिना व्यतिरिक्त तब्बू, जॅकी श्रॉफ, दिशा पटानी आणि सुनील ग्रोवर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिशा, जॅकी आणि सुनील ग्रोवर यांची भूमिका पाहायला मिळाली आहे. परंतु तब्बूची एकही झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली नाही. सूत्रांनुसार तब्बू ‘भारत’ चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. तसेच चित्रपटाची कथा ही तब्बूच्या भूमिकेभोवती फिरणारी आहे. चित्रपटात तब्बूची एन्ट्री होताच चित्रपटाची कहाणी कलाटणी घेते. निर्मात्यांना तिची भूमिका गुलदसत्यात ठेऊन चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी सर्वांना आश्चर्यचकित करायचे आहे. चाहते तब्बूची भूमिका पाहण्यासाठी फार उत्साही आहेत.
अॅक्शन सीन आणि भूतकाळावर प्रकाश टाकणाऱ्या काही घटना या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आल्यामुळे कमी कालावधीत तो प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. या चित्रपटामध्ये सलमान कतरिनाला ‘मॅडम सर’ या विशेष नावाने संबोधत असल्याचे पाहायला मिळतय. तर जॅकी श्रॉफ यांनी सलमानच्या वडीलांची भूमिका वठविली आहे. प्रदर्शित झालेला ट्रेलर तीन मिनीट ११ सेकंदांचा असून या ट्रेलरमध्ये भारतचा(सलमान खान) आयुष्यातील काही घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये सलमानने तारुण्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत अनेक रुपे साकारली आहेत. त्यामुळे सलमान पहिल्यांदाच पाच वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हा चित्रपट ईदला म्हणजेच ५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर ‘भारत’ आधारलेला आहे. ‘भारत’ चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत.