मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘सैराट’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आज सर्वत्र प्रदर्शित होणाऱया या चित्रपटाबाबतची रसिकांमधील उत्सुकता शीगेला पोहोचली आहे. ‘फॅन्ड्री’ या आपल्या पहिल्याच सिनेमातून लक्ष वेधून घेणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळेचा हा दुसरा चित्रपट. नागराजचा सैराट चित्रपट तुम्ही का पाहाल याची पाच कारणे पुढीलप्रमाणेः
नागराज मंजुळे- पिस्तुल्या या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला अन् नागराज मंजुळे हे नाव बघताबघता प्रसिद्ध झालं. सत्य आणि सामाजिक विषमता यांची योग्य जोडणी आपल्याला नागराजच्या चित्रपटात पाहावयास मिळते. तसेच आयुष्यात कधीही कॅमे-यासमोर उभे न राहीलेल्या नायक-नायिकेकडून सराईत कलाकारांप्रमाणे दर्जेदार अभिनय करुन घेणे हे नागराजचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
अजय-अतुलचे संगीत- प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलच्या गाण्यांनी प्रेक्षकांना याआधीच ‘याडं लावलं’ आहे. याडं लागलं, सैराट झालं जी, आत्ताच बया का बावरलं आणि झिंगाट ही गाणी स्वतः या संगीत दिग्दर्शक जोडीने लिहली आहेत. गाण्यात करण्यात आलेला ग्रामीण शब्दांचा वापर आपल्याला याडं लावून जातो. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचे संगीत हॉलीवूडमध्ये रेकॉर्ड करण्यात आले असून याचा मान अजय-अतुलला मिळालायं.
रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर- चित्रपटातील मुख्य कलाकार रिंकू आणि आकाश या नवख्या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने तुम्हाला याडं नाही लावलं तर नवलचं आहे. या चित्रपटासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेय. या दोघांची निवडही अगदी वेगळ्या पद्धतीने झाली. रिंकू राजगुरूची सैराटसाठी अभिनेत्री म्हणून निवड झाली तेव्हा ती सातवीत होती, आता ती इयत्ता नववीत आहे. आकाश हा नागराज मंजुळेला एका रेल्वे स्टेशनवर दिसला होता. तेथे त्याने सैराटच्या हिरोसाठी त्याची निवड केली. आकाश हा पहेलवान होता, त्याला सैराटसाठी वजन कमी करावं लागलं.
चित्रपटातील लोकेशन्स- मराठी चित्रपट शक्यतो ज्या पठडीतल्या लोकेशन वापरतो त्या टाळून थेट करमाळ्यासारख्या आडबाजूच्या तालुक्यात चित्रिकरण करुन नवख्या लोकेशनचं सौंदर्य काय असू शकते हे या चित्रपटात चांगल्या प्रकारे दाखवून दिले आहे. ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलेली लोकेशन्स आपले लक्ष वेधून घेतात.
उत्कंठावर्धक ट्रेलर- गाण्यांपाठोपाठ चित्रपटाच्या ट्रेलरलाही रसिकांनी तुफान प्रतिसाद दिल्यामुळे या चित्रपटाबाबत सर्वांचीच उत्कंठा वाढली आहे.