‘लय भारी’ या सुपरहिट मराठी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटातील अभिनयाचा श्रीगणेशा करणाऱ्या रितेश देशमुखने वर्षाला एक तरी मराठी चित्रपट करण्याची मनिषा व्यक्त केली. चित्रपट हिंदी आहे अथवा मराठी हे आपल्यासाठी गौण असून, चित्रपटात भूमिका साकारणे हे महत्वाचे आहे. असे असले तरी, वर्षाला एक तरी मराठी चित्रपट करण्याचा प्रयत्न करणार असल्याची इच्छा त्याने जाहीर केली. पहिल्यावहिल्या ‘अजिंक्य डी. वाय. पाटील फिल्मफेअर अॅवॉर्डस् (मराठी)’ची घोषणा करताना तो बोलत होता.
दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘बालक पालक’ या यशस्वी मराठी चित्रपटाद्वारे रितेशने मराठीत निर्माता म्हणून पाऊल ठेवले. त्यानंतर ‘लय भारी’ चित्रपटाद्वारे त्याने मराठी चित्रपटात पहिल्यांदा अभिनय केला. ‘लय भारी’ आत्तापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. ‘लय भारी’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील चांगल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत आगामी काळात आणखी मराठी चित्रपट करण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली. ‘लय भारी’ चित्रपट करताना खूप मजा आली. ‘लय भारी’मध्ये आम्ही काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. दाक्षिणात्य चित्रपटांच्या धर्तीवर मराठीतदेखील ‘अॅक्शन ड्रामा’ प्रकारातील चित्रपट साकारण्याचा निशिकांत आणि मी विचार केला होता. मराठी चित्रपट रसिक हिंदी चित्रपट पाहात असल्याने यात नवीन असे काही नव्हते, परंतु, मराठी चित्रपटसृष्टीसाठी निश्चितच हा वेगळा प्रयोग होता, फिल्मफेअर (मराठी) पुरस्कार अनावरण्याच्या प्रसंगी बोलताना रितेशने अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. फिल्मफेअरच्या मराठी चित्रपटसृष्टीसाठीच्या पुरस्कार घोषणेचे त्याने स्वागत केले.
‘अजिंक्य डी. वाय. पाटील फिल्मफेअर अॅवॉर्डस (मराठी)’ पुरस्काराद्वारे मराठी चित्रपटाचा सन्मान करण्यासाठी फिल्मफेअर सज्ज झाले आहे. ज्यात २०१४ सालमध्ये चित्रपट निर्मिती, संगीत विभाग, निर्मिती कला, अभिनय आणि अन्य विभागांत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या चित्रपटांचा समावेश असेल.

Story img Loader