सध्या सगळेच प्रेक्षक ओटीटीकडे वळले आहेत. खासकरून ओटीटीच्या बाबतीत भारतीय प्रेक्षकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोविड महामारीमुळे ही वाढ झाली आहे. पण त्याआधी प्रेक्षकांना ‘वेबसीरिज’ची ओळख करून देणारा एकमेव शो तो म्हणजे ‘गेम ऑफ थ्रोन्स’. या वेबसिरिजची भारतात खासकरून जास्त चर्चा झाली. भारतीया प्रेक्षकांनी वेगवेगळ्या कारणांसाठी या सीरिजची पारायाणं केली आहेत. यामधली पात्रं तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. आता याच सिरिजचा प्रीक्वल म्हणजेच या सिरिजच्या आधीची गोष्ट पुन्हा एकदा वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
लेखक जॉर्ज आर आर मार्टिन यांच्या लोकप्रिय ‘फायर अँड ब्लड’ या कादंबरीवर आधारीत ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’ उद्या म्हणजेच २२ ऑगस्ट रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यात ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधल्या कहाणीच्या २०० वर्षं आधी घडलेल्या घटनांना दाखवण्यात येणार आहे. १० एपिसोडची ही सीरिज उद्यापासून चाहत्यांना बघता येणार आहे. यामध्ये हाऊस ऑफ टार्गेरीयनचा इतिहास दाखवला जाणार आहे. या सीरिजमध्ये आणखीन कोणती वेगळी पात्रं आपल्याला बघायला मिळणार, राजसिंहासनासाठी नेमकी कोणामध्ये चुरस बघायला मिळणार या सगळ्या गोष्टींचा उलगडा उद्यापासून होणार आहे.
तसं बघायला गेलं तर या सीरिजमधलं प्रत्येक पात्रं उत्कृष्टच आहे. पण यातलं राजकुमारी रेनेरा हिच्या पात्रासाठी बरेच प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘गेम ऑफ थ्रोन्स’प्रमाणे या सीरिजमध्येसुद्धा प्रेक्षकांना अनपेक्षित धक्के बसू शकतात असं यातल्या कलाकारांचं म्हणणं आहे.
नुकताच या सीरिजचा प्रीमियर शो मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला भारतीय मनोरंजन विश्वातल्या बऱ्याच नावाजलेल्या लोकांनी हजेरी लावली आणि या सीरिजबद्दल आपलं मत व्यक्त केलं. युट्यूबर प्राजक्ता कोळी, अभिनेता अभिषेक बॅनर्जी, जीम सार्भ, स्टँड-अप कॉमेडीयन रोहन जोशी यांनी याठिकाणी हजेरी लावून आपलं या वेबसीरिजप्रती असलेलं प्रेम मोकळेपणाने व्यक्त केलं.
आणखीन वाचा : काय आहे Game of Thrones? जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे..