पुढच्या महिन्यात वानखेडे स्टेडियमवर होणारी सचिनची २०० वी कसोटी आणि अंतिम आंतरराष्ट्रीय खेळी पाहण्यासाठी या सामन्याचा तिकिटांना जगभरातून मोठ्या प्रमाणावर मागणी होते आहे. अगदी अमेरिकेतूनसुद्धा सचिनचे चाहते तिकिट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
शाहरुख खानला सामना पाहण्यासाठी परवानगी देणार का, याबाबत विचारले असता, पवार म्हणाले, एमसीएच्या वास्तूत प्रवेशासाठी ज्यांना बंदी नाही, असा कोणीही हा सामना पाहू शकतो.
२०१२ मध्ये शाहरूख खानने आयपीएलच्या सामन्यादरम्यान गैरवर्तन केल्याप्रकरणी एमसीएने बॉलिवूडच्या या बादशाहला वानखेडे स्टेडियमवर प्रवेशबंदी घातली होती.
सचिनच्या निवृत्तीवृत्ताने निराश झालेला शाहरूख आपल्या संदेशात म्हणाला होता, मला हे वृत्त ऑस्ट्रेलियात समजले… बातमी कळायला जरा उशीरच झाला… मला खूप वाईट वाटले. त्याला या खेळाची उत्तम जाण असल्यानेच त्याने हा निर्णय घेतला. त्याने खूप क्रिकेट खेळले आहे. आता त्याने विश्रांती घ्यावी, आराम करावा आणि कुटुंबियांसमवेत आनंदात वेळ घालवावा.
सचिनने २००० तिकिटांची मागणी केली असल्याच्या वृत्ताचे शरद पवारांनी खंडण केले. त्याने एकाही तिकीटाची मागणी केली नसून, त्याला ५०० तिकीटे देण्याचा निर्णय एमसीएच्या समितीने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader