शाहिद कपूर हा बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून वेळोवेळी हे सिद्ध केले आहे की उत्तम अभिनय करण्यापासून त्याला कोणीही अडवू शकत नाही. त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमधून त्याने स्वतःला एक चांगला अभिनेता म्हणून घडवले आहे. सध्या शाहिद आपला आगामी चित्रपट ‘जर्सी’ प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी खूपच लोकप्रिय ठरली आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत शाहिदने अभिनयाव्यतिरिक्त लेखन आणि दिग्दर्शन करण्याबद्दल आपले विचार सांगितले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेव्हा शाहिदला विचारण्यात आले की तो त्याचे वडील पंकज कपूर यांच्याप्रमाणे लेखन करू शकेल का? यावर त्याने उत्तर दिले की मला असे वाटत नाही की माझ्याकडे लिहिण्याची क्षमता आहे. त्याने पुढे असे सांगितले की जे लोक लिहू शकतात आणि संगीत तयार करू शकतात त्यांच्याबद्दल त्याला आकर्षण आहे कारण शाहिदच्या मते तेच लोक काहीतरी विलक्षण तयार करतात. शाहिदने आपल्या वडिलांबद्दल बोलताना सांगितले की पंकज कपूर खूप छान लिहितात आणि त्याला त्यांचे बरेच काम वाचण्याचा मान मिळाला आहे. पुढे त्याने समारोप करताना म्हटले की माझ्यात ती प्रतिभा आहे असे मला वाटत नाही.
जेव्हा त्याला दिग्दर्शनात पाऊल टाकण्यासंबंधी विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, तो आता या क्षेत्रातील नवीन गोष्टी शिकत आहे, त्यामुळे तो सध्या आपले काम बदलण्याचा विचार करत नाही. तो म्हणाला, “मी सध्या अभिनय सोडायला तयार नाही. दिग्दर्शन हे पूर्णवेळ काम आणि ते तसेच असणे गरजेचे आहे.” त्याने पुढे खुलासा केला की त्याच्या मनात एकही कथा नाही जी जगाला सांगण्यास तो उत्सुक आहे. “लेखन आणि दिग्दर्शन या दोन गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्हाला पूर्णपणे त्यासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे आणि ते सध्या माझ्या मनात नाही.” असे त्याने सांगितले.
दरम्यान, कबीर सिंगनंतर जर्सीमधील शाहिद कपूरची जादू रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात मृणाल ठाकूर देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ‘जर्सी’ या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. नानी या अभिनेत्याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.